
यापुढे मंत्रिमंडळ बैठकीला कोणताही मंत्री दांडी मारणार नाही. कितीही अडचण असली तरीही मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे,असे फर्मान उपमुख्यमंत्र्यांनी काढलेत.
मुंबई: यापुढे मंत्रिमंडळ बैठकीला कोणताही मंत्री दांडी मारणार नाही. कितीही अडचण असली तरीही मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिलेच पाहिजे,असे फर्मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहे. तसेच मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी महाविकास आघाडीतल्या पक्षाच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकी पूर्वीची बैठक होणार असून त्याची सुरूवात झाली आहे.
कोरोना रोगाच्या साथीमुळे मंत्रिमंडळ बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पाडल्या जात होत्या. त्यामुळे अनेक मंत्री बैठकांना दांडी मारायचे. तर काही मंत्री ऑनलाईन उपस्थित राहत होते. मात्र रेंज नाही. अथवा प्रवासात आहे असे सांगून या बैठकीतून काढता पाय घ्यायचे ही बाब अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे सांगितले जाते.
कोरोना रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या लसीकरण कार्यक्रम जोराने सुरू आहे. राज्य सरकारने देखील मंत्रिमंडळ बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न घेता प्रत्यक्ष भेटून पार पाडण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित सह्याद्री या शासकीय विश्रामगृहात मंत्रिमंडळ बैठक पार पाडली. या बैठकीला सर्व मंत्री उपस्थित असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रालयाजवळ बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्याच्या अखत्यारीतील खात्या संदर्भातील असणाऱ्या विषयाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच ऐनवेळी एखादा विषय चर्चेला आला तर त्यावर नेमके कोणी काय बोलावे याची रणनिती ठरल्याचे सांगितले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक अजित पवार यांनी तर काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक महसूलमंत्री थोरात यांनी बोलावली होती. दोन्ही काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठकात मंत्रिमंडळ बैठकीत नेमके आणि मुद्देसूद चर्चा होऊन विषय मार्गी कसे लागतील. यावर यापुढे भर देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे तीन पक्षाचे सरकार असून तीन पक्षात मतभेद असले तरी मंत्रिमंडळ बैठकीत ताळमेळ असावा. राज्य सरकार आणि प्रशासन यातील भेद चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी नेमाने बैठक घेण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा- स्टुडंस्ट्स चला तयारीला लागा...! लवकरच राज्यातील कॉलेज सुरू होणार
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)