#BMCissues मंत्र्यांच्या बंगल्यात पाणीबाणी

#BMCissues मंत्र्यांच्या बंगल्यात पाणीबाणी

मुंबई - पावसाळा संपला असताना ऑक्‍टोबर महिन्यातच मंत्रालयासमोरील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यातील पाणीपुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बंगल्यांमधील कर्मचारी आणि भेट देणारे अभ्यागत संताप व्यक्त करीत आहेत. १० दिवसांपासून अशी परिस्थिती असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी ट्विटरवरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यांमध्ये विविध कर्मचारी कार्यरत असतात. त्यांना कामानिमित्त भेटण्यासाठी राज्यभरातून अनेक जण येत असतात. बंगल्यांत अनेकांची वर्दळ नेहमीच असते. त्या सर्वांचा योग्य पाहुणचार करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर असते; पण पाणीच नसल्यामुळे त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. सर्वांचेच हाल सुरू असून पाणीबाणीमुळे कर्मचारी संतापले आहेत. १० दिवसांपासून कपातीची समस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत ट्विटरवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांचे स्वीय सहायक प्रशांत जोशी म्हणाले, की आमच्याकडे राज्यातून सर्वांत जास्त नागरिक येतात. त्यांना पिण्यापासून प्रसाधनगृहासाठी लागणारे पाणीही नसल्याने गैरसोय होत आहे. पाणीकपात आहे की नाही, याचीही कल्पना देण्यात आलेली नाही.

धनंजय मुंडे, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, बबनराव लोणीकर आदींसह काही मंत्र्यांना १० दिवसांपासून अपुऱ्या पाण्याचा फटका बसत आहे. मंत्र्यांच्या घरात उष्ट्या भांड्यांचा ढीग लागला आहे. बादलीत पाणी साठवून ठेवण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.

पाणीकपात, वीज भारनियमन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्या सामान्य माणसासाठी नव्या नाहीत. औरंगाबादमध्ये नुकताच भारनियमनाचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बसला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

क्रॉस कनेक्‍शनचा फटका?
जलवाहिनीत क्रॉस कनेक्‍शन झाल्याने मंत्र्यांच्या बंगल्यात पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. सप्टेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यात पवई वेरवलीतील जलबोगद्याच्या झडपेचे काम करण्यात आले. त्यानंतर खास करून पश्‍चिम उपनगरात पाण्याची मोठी समस्या जाणवत आहे. त्यातच काही दिवसांपासून मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांनाही अघोषित पाणीकपातीचा फटका बसला. मंत्र्यांच्या बंगल्यांमध्येच पाणीपुरवठा होत नसल्याचे समजताच पालिकेची चांगलीच पळापळ झाली. बंगल्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तपासल्यावर क्रॉस कनेक्‍शनमुळे पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असल्याचे आढळले. तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा झाला होता. दुरुस्ती करण्यात आली आहे, असे ए प्रभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com