155 द.ल.लि. पाणी कागदावरच! मिरा-भाईंदर पालिकेकडे अपुरी यंत्रणा असल्याचा आरोप

संदीप पंडित
Friday, 23 October 2020

मिरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून 86 द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो, तर एमआयडीसीकडून 135 द.ल.लि. पाणीपुरवठा होतो; मात्र आरक्षित पाण्यापैकी सरासरी 105 द.ल.लि. पाणीपुरवठा पालिकेला होत आहे.

भाईंदर : भाईंदर शहराला एमआयडीसीकडून 155 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पाणी उचलण्यास पालिका प्रशासनाकडे पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या काळात शहरासाठी मंजूर झालेले पाणी कागदावरच राहणार असल्याचे मत आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. 

हे ही वाचा : 'भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्याने म्हटले की, पक्ष बदलता आला तर बदलून टाका'' - एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

मिरा भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणकडून 86 द.ल.लि. पाणीपुरवठा केला जातो, तर एमआयडीसीकडून 135 द.ल.लि. पाणीपुरवठा होतो; मात्र आरक्षित पाण्यापैकी सरासरी 105 द.ल.लि. पाणीपुरवठा पालिकेला होत आहे. यातदेखील गेल्या काही दिवसांपासून 25 द.ल.लि. पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याने परिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी (ता. 19) मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एमआयडीसीकडून 135 द.ल.लि. पाणी आणि नवी मुंबईकडून 20 द.ल.लि. पाणी असे एकूण 155 द.ल.लि. पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात मिरा-भाईंदर शहरात इतके पाणी उचलण्याची यंत्रणा नसल्यामुळे हा निर्णय केवळ कागदावर मर्यादित राहणार आहे. 

महत्वाची बातमी : आज वर्षा बंगल्यावर अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी मंत्रिमंडळाची बैठक

मिरा-भाईंदर महानगरपालिकेला एमआयडीसी 135 द.ल.लि. पाणी आरक्षित करण्यात आले आहे. साकेतमधून पालिका 60 ते 70 द.ल.लि. पाणी उचलते, तर कापूरबावडीमधून केवळ 30 द.ल.लि. पाणी उचलले जाते. सध्या शहरात पाण्याची समस्या दूर करण्याकरिता पालिकेला याच कापूरबावडीमधून अधिक पाणी उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे; परंतु हे पाणी उचलण्याकरिता आवश्‍यक यंत्रणाच सध्या उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय काही दिवस प्रलंबित राहणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

नक्की वाचा : अनुसूचित जमातीतील सहायक प्राध्यापक पदभरतीत घोटाळा? SC/ST आयोगाने मागविला अहवाल

मिरा भाईंदर शहरात पाण्याची साठवण करण्याकरिता सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे भविष्यात अधिक पाण्याची कमतरता भासू शकते. यावर मी प्रशासनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच आता येणारे पाणी पुरेसे नसून अधिक पाण्याची आवश्‍यकता असल्याने त्याचीदेखील मागणी केली आहे. 
- प्रताप सरनाईक, आमदार 

(संपादन : वैभव गाटे)

Mira Bhayander Municipality is accused of having inadequate system


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mira Bhayander Municipality is accused of having inadequate system