
आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका गुणवान विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना चुकून केलेली एक क्लिक चांगलीच महागात पडली आहे. यामुळे त्याचा प्रवेश अर्ज बाद झाला असून, त्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रवेशासाठी याचिका दाखल केली आहे.
मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका गुणवान विद्यार्थ्याला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना चुकून केलेली एक क्लिक चांगलीच महागात पडली आहे. यामुळे त्याचा प्रवेश अर्ज बाद झाला असून, त्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रवेशासाठी याचिका दाखल केली आहे.
मूळचा दिल्लीकर असलेला याचिकादार विद्यार्थी सिध्दार्थ बात्राला जेईई एडव्हान्सड परीक्षेत 270 वे गुणांकन मिळाले आहे. प्रवेश अर्ज दाखल करत असताना चुकीने त्याने एका लिंकवर क्लिक केले. ज्यामुळे तो पूर्ण प्रक्रियेतूनच बाहेर पडला. आकस्मिकपणे झालेल्या या चुकीमुळे त्याने पुन्हा प्रयत्न केले. मात्र अयशस्वी ठरल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्यायालयाने याबाबत आयआयटी व्यवस्थापनाला निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र व्यवस्थापनाने नकार दिला असून नियमानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे सांगितले. त्यामुळे त्याची याचिका खंडपीठाने नामंजूर केली आहे. याविरोधात त्याने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
मेहनतीने गाठला होता टप्पा
दिल्लीत आजी आजोबांबरोबर राहणाऱ्या सिध्दार्थचे आई-वडिलांचे निधन झाले आहे. खूप कष्ट आणि मेहनत करुन परिक्षा पास झालो आहे, अशी विनवणी त्याने केली आहे. अर्ज भरत असताना अचानक आलेल्या एका लिंकवर त्याने चुकुन क्लिक केले. स्वतःहून या प्रवेश प्रक्रियेतून बाहेर येत आहे, असे सांगणारी ही लिंक होती. यानंतर विद्यार्थ्यांना फी परतावा मिळतो पण प्रक्रियेतून बाहेर जावे लागते.
------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)