Mumbai News : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Pune-Mumbai Expressway

Mumbai News : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण

मुंबई : वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, १० नोव्हेंबर पर्यंत एकूण प्रकल्पाचे काम ५५ टक्के पूर्ण झाले होते.

दोन पॅकेज मध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये पहिल्या पॅकेजमधील बोगद्याचे काम ६१.२९ टक्के पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या पॅकेज मध्ये सुरू असलेले व्हायाडक्टचे काम ३९.९३ टक्के पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करण्याचे काम सुरू आहे. तर खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ किलोमिटर च्या राहिलेल्या लांबीसाठी एक १.६८ किलोमिटर, दुसरा ८.८७ किलोमिटर असे दोन बोगदे आणि ०.९०० किलोमिटर, ०.६५० किलोमिटर व्हायाडक्टचे बांधकाम असे एकूण १९.८४ किलोमिटर लांबीचा ८ पदरी रस्ता बांधणे प्रस्तावित आहे.

या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्थेपर्यंतचे १९ किलोमीटरचे अंतर ६ किलोमिटरने कमी होवून १२.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनीटांची बचत होणार असून, दोन्ही पॅकेज चे काम सप्टेंबर अखेर पूर्ण होणार असल्याचे एम एस आर डी सी प्रशासनाने सांगितले आहे.