पोलिसांच्या बोधचिन्हाचा गैरवापर?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नवी मुंबईत अनेक वाहनांवर बिनदिक्कतपणे ‘पोलिस’ अशा नावाची पाटी व पोलिसांचे बोधचिन्ह लावून वाहने चालवली जात असल्याचे समोर आले आहे. अशा वाहनचालकांवर कारवाई करावी; तसेच पोलिस स्टिकर लावून देऊ नयेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त व राज्याच्या गृह खात्याकडे केली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत अनेक वाहनांवर बिनदिक्कतपणे ‘पोलिस’ अशा नावाची पाटी व पोलिसांचे बोधचिन्ह लावून वाहने चालवली जात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या वाहनधारकांना वाहतूक पोलिससुद्धा अटकाव करत नसल्याचे आढळून आले आहे. अशा बेदरकारपणे वाहनचालकांवर कारवाई करावी; तसेच पोलिस स्टिकर लावून देऊ नयेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्त व राज्याच्या गृह खात्याकडे केली आहे.

एखाद्या खासगी वाहनावर पोलिस नावाची पाटी किंवा पोलिसांचे बोधचिन्ह लावण्यास सक्त मनाई आहे. असे केल्यास त्या वाहनचालकावर मोटार अधिनियम १३४ अन्वये कारवाई होऊ शकते. मात्र, हे कायदे आणि नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? सवाल निखिल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. नवी मुंबईत सध्या ‘पोलिस’ असे लिहिलेली पाटी व पोलिसांचे बोधचिन्ह लावून सर्रासपणे वाहने चालवली जात आहेत. यात महाविद्यालयीन तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वाहने भरधाव नेऊन चालक वाहतुकीचे नियम मोडत कायद्याची पायमल्ली करतात. सर्वसामान्य नागरिकांना क्षुल्लक कारणावरून हटकणारे वाहतूक पोलिसदेखील पोलिस स्टिकर लावलेल्या वाहनांना अडवत नाहीत. नियमानुसार शासकीय वाहनांवरच ‘पोलिस/महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले असते आणि त्या वाहनाचा वापर शासकीय कामांसाठीच असतो. मात्र समाजात आपली प्रतिमा उंचावण्यासाठी व वाहतूक पोलिसांची कारवाई, नो पार्किंगमधील कारवाई टाळण्यासाठीही काही जण या पाट्यांचा व बोधचिन्हाचा वापर करताना दिसत आहेत. बऱ्याच वेळा या स्टिकर लावलेल्या गाड्या पोलिसांची मुले, नातेवाईक चालवत असल्याचा संशय बळावतो. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांवर कारवाई करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निखिल म्हात्रे यांनी केली आहे.

शहरात वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने नित्याने कारवाई सुरू असते आणि अशा प्रकारे जर कोणी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह लावून फिरताना आढळून आल्यास त्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल.
- अरुण पाटील, सहायक आयुक्त, नवी मुंबई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Misuse of police logos?