मिठी गिळणार चार कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

मुंबई - मिठी नदीच्या साफसफाईसाठी यंदा तीन कोटी 82 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठी कोट्यवधी रुपये गिळणार आहे.

मुंबई - मिठी नदीच्या साफसफाईसाठी यंदा तीन कोटी 82 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे दरवर्षीप्रमाणे यंदाही मिठी कोट्यवधी रुपये गिळणार आहे.

मुंबईतील नद्या, मोठे नाले, पातमुखे यात माती, कचरा साचतो. नदी नाले गाळाने भरतात. पर्जन्य जलवाहिन्यांतून सांडपाणी आणि काही प्रमाणात मल वाहून जातो. काही पर्जन्य जलवाहिन्या भरती-ओहोटीमुळे बाधित होतात. परिणामी तुंबलेल्या पाण्याचा निचरा होत नाही आणि कचरा वाहून जात नाही. त्यामुळे पर्जन्य जलवाहिन्यांतील गाळ दरवर्षी काढला जातो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. 26 जुलै 2005 च्या महापुरानंतर महापालिकेने मिठी नदीवर लक्ष केंद्रित केले आहे.

पावसाळ्यापूर्वीची पहिल्या टप्प्यातील नालेसफाईची कामे 1 एप्रिलपासून सुरू करून 31 मेपर्यंत संपवायची आहेत. या कालावधीत 60 टक्के गाळ काढण्यात येणार आहे. मिठीच्याही कामाला सुरुवात होणार आहे. मिठीतून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेकडे क्षेपणभूमी नाही. त्यामुळे कंत्राटदाराने स्वतःहून गाळाची विल्हेवाट लावावी, असे आदेश प्रशासनाने कंत्राटदारांना दिले आहेत. गेल्या वर्षीही गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर होती; मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मिठी नदीतून काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी यंदाही कंत्राटदारांवर आहे. पालिकेच्या क्षेपणभूमीची क्षमता संपल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सीएसटी पूल (कुर्ला) ते फिल्टरपाडा (पवई) यादरम्यानचा मिठीतील गाळ काढण्याचे काम भारती कन्स्ट्रक्‍शनला देण्यात येणार आहे. हे कंत्राट तीन कोटी 82 लाखांचे आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: mithi river uncleaned