
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार हे आपल्या ग्राउंड झिरोवरील कामांसाठी कायम ओळखले जातात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार हे आपल्या ग्राउंड झिरोवरील कामांसाठी कायम ओळखले जातात. आजही रोहित पवार यांनी अचानकच पहाटे चार वाजता नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन भाजी आणि फळ मार्केटचा अचानक दौरा केला.
हेही वाचा : हिवाळ्यामुळे कोबी, टॉमेटो तसेच भाज्यांचे भाव गडगडल्याने महिलांना दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज पहाटे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीला (APMC) भेट दिली. रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मधील भाजी आणि फळ मार्केटमध्ये पोहोचलेत आणि त्यांनी तेथील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी उत्पन्न बाजार समितीची यंत्रणा समजून घेण्याचा रोहित पवार यांनी प्रयत्न केला. फळ आणि भाजी मार्केटमध्ये फिरताना आमदार रोहित पवार यांनी अनेक शेतकऱ्यांची थांबून विचारपूस केली. त्यांना काय अडचणी सतावतायत हे देखील जाणून घेतलं. यावेळी रोहित पवार यांनी माथाडी कामगार तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. "केंद्राने राज्यावर कृषी कायदे लादले असले तरी महाराष्ट्रातील सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल," असा विश्वास रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवला. शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची गरज असल्याचेही रोहित पवार म्हणालेत.
रोहित पवार यांनी अचानक केलेल्या दौऱ्यामुळे आता रोहित पवार येत्या काळात येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी पूर्णपणे सक्रिय होण्याची चिन्ह आहेत, सोबतच रोहित पवार विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडताना पाहायला मिळतील असं राजकीय विश्लेषक म्हणतात.
अजित पवारांच्या पावलावर पाऊल
रोहित पवार यांच्या आजच्या दौऱ्यानंतर अनेकांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील आठवण झाली. अजित पवार यांच्या कामाचा धडाका अनेकांनी अनुभवाला आहे. रोहित पवार आज ज्याप्रकारे APMC मार्केटमध्ये पोहोचलेत, तसेच पुण्यामध्ये अशाचप्रकारे पहाटे अजित पवार मेट्रो कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते.
mla rohit pawar visits APMC market of navi mumbai early in the morning