विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर? | Ramdas kadam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

मुंबई: यंदा विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराला शिवसेनेकडून संधी मिळू शकते. रामदास कदम यांच्या रिक्त जागेसाठी शिवसेना आणि युवासेनेतील पाच नावं चर्चेत आहेत. रामदास कदम (ramdas kadam) यांच्याबद्दल सध्या शिवसेनेत (Shivsena) नाराजीची भावना आहे. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांना अडचणीत आणण्यामागे रामदास कदम असल्याचे बोलले जात आहे. रामदास कदम यांनीच किरीट सोमय्यांना अनिल परब यांच्याविरोधात रसद पुरवली, असा आरोप मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी केला होता.

विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी शिवसेनेतून सुनील शिंदे, सचिन अहिर, महापौर किशोरी पेडणेकर तर युवासेनेतून सुरज चव्हाण, वरूण सरदेसाई यांची नावं चर्चेत आहेत. २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेला सचिन अहिर आणि वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवल्याने आपली जागा सोडणारे सुनील शिंदे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे तिकिट कोणाला मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: T20 WC - पाकच्या पराभवानंतर अख्तरला शब्द सुचेनात; पाहा VIDEO

वरुण सरदेसाई यांचे नाव सध्या नेहमीच चर्चेत असते. आदित्य ठाकरेंच्या साथीने ते युवा सेनेत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. नात्याने ते आदित्य ठाकरेंचे बंधु आहेत. विरोधकांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यासाठी अनेकदा वरुण सरदेसाई यांच्या नावाचा वापर केला जातो.

हेही वाचा: भाजपाच्या माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडप केली -नवाब मलिक

वरुण सरदेसाई सेना नेतृत्वाच्या जवळचे असून विश्वासू आहेत. त्यामुळे वरुण सरदेसाईंनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना युवा नेतृत्वाला संधी देणार की, अनुभवाला प्राधान्य ते लवकरच स्पष्ट होईल.

टॅग्स :Ramdas Kadam