दहा वर्षे गैरहजर शिक्षिका पुन्हा सेवेत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर जाताना वरिष्ठ अधिकारी व महानगरपालिका आयुक्‍तांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या शिक्षिकेला पुन्हा कामावर घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते श्‍याम अग्रवाल यांनी आयुक्‍त हिरे यांच्याकडे केली आहे. 

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात काम करणारी सहशिक्षिका तब्बल 10 वर्षे गैरहजर राहून पुन्हा कामावर रुजू झाली आहे. या सहशिक्षिकेने रजेवर जाताना वरिष्ठ अधिकारी व महानगरपालिका आयुक्‍तांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे या शिक्षिकेला पुन्हा कामावर घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेते श्‍याम अग्रवाल यांनी आयुक्‍त हिरे यांच्याकडे केली आहे. 

शहरातील मनपा शाळा क्र. 26 मध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या फरदीन अब्दुल गनी शेख या सन 2017 पासून पालिका प्रशासन व आयुक्तांची कोणाचीही परवानगी न घेता गैरहजर राहिल्या होत्या. शिक्षिका गैरहजर असल्याच्या अनेक तक्रारी पालकांनी तत्कालीन प्रशासन अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या; मात्र याबाबत कोणताही निर्णय आजपावेतो घेण्यात आलेला नाही. दिर्घकालीन रजेवर गेलेल्या या शिक्षिकेवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता; तसेच पालिका प्रशासन व आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर कामावर हजर करून घेतले. याप्रकरणी शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी पी. एम. मोहिते यांच्यावर महानगरपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करावी आणि शिक्षण मंडळात सुरू असलेल्या गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पालिकेचे विरोधी पक्षनेता श्‍याम अग्रवाल यांनी आयुक्त हिरे यांच्याकडे लेखी तक्रार पत्र देऊन केली आहे. 

शिक्षिकेला पुन्हा कामावर रूजू करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त मनोहर हिरे यांचा अभिप्राय घेणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता मोठ्या प्रमाणात अर्थकारण करून त्यांना कामावर घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. 

फरदीन शेख यांची पुनर्नियुक्ती करताना ती शिक्षण विभागात कार्यरत असल्याचे भासवून त्यांना वरिष्ठ श्रेणीची बढती देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शिक्षकांकडून हे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी प्रशासन अधिकारी मोहिते यांना तत्काळ निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीची मागणी भाजपचे गटनेते नीलेश चौधरी यांनी केली आहे.

राज्य शिक्षण विभागाच्या उपसंचालकांच्या सांगण्यावरून फरदीन शेख यांना हजर करून घेतले. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. वैद्यकीय रजेवर जाताना परवानगीची आवश्‍यकता नसते. - पी. एम. मोहिते, प्रशासकीय अधिकारी भिवंडी मनपा शिक्षण मंडळ  

भिवंडी महानगरपालिका प्रशासनाची परवानगी न घेता गैरहजर राहणाऱ्या शिक्षिकेबाबत; तसेच त्यांना कामावर घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची सखोल चौकशी केली जाईल. - मनोहर हिरे, आयुक्त, भिवंडी महानगरपालिका 

Web Title: MNP Bhiwandi teacher case