"वाडिया' बंदमुळे मनसे आक्रमक पवित्र्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

रुग्णालय आर्थिक डबघाईस आणून बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मनसेने केला असून तसे प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

मुंबई : महापालिका व रुग्णालय प्रशासनातील वादामुळे आर्थिक संकटात सापडलेले परळ येथील नरसोजी वाडिया मॅटर्निटी रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशा प्रकारची नोटीसच रुग्णालय प्रशासनाने काढल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांची फरपट सुरू आहे. रुग्णालय आर्थिक डबघाईस आणून बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मनसेने केला असून तसे प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. 

महत्वाचं - रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर; आता सुरू होणार पॉड हॉटेल

राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून वाडिया रुग्णालय प्रशासनास अनुदान देण्यात येते; मात्र काही महिन्यांपासून रुग्णालयाला येणारे 100 कोटींहून अधिक अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासन वैद्यकीय उपकरणे, पुरवठा आणि औषधे पुरवणाऱ्या विविध विक्रेत्यांची थकबाकी देऊ शकले नाही. त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाल्याने रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. 

विश्वासू चालकानेच लावला 12 लाखाचा चुना, पोलिसांनी केली अटक

वाडिया मॅटर्निटी रुग्णालय हे प्रसूतीसह लहान मुलांवरील उपचारासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईसह नजीकचे जिल्हे आणि राज्यभरातून अनेक महिला प्रसूतीसाठी येथे येतात. सुरुवातीला हे रुग्णालय गिरणी कामगारांसाठी स्वस्त दरात चांगले उपचार देणारे रुग्णालय होते. कालांतराने गिरण्या बंद झाल्या; पण रुग्णालय प्रशासनाने आपली सेवा अविरत सुरू ठेवली; मात्र पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने कबूल केलेले अनुदान देण्यास हात आखडता घेतल्याने रुग्णालय आर्थिक डबघाईस आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. 

 

मुंबईची ओळख बनलेले वाडिया रुग्णालय बंद पाडण्याचे षड्‌यंत्र रचले जात आहे. तसे झाल्यास मनसे याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन करील. 
- आनंद प्रभू, 
विभाग अध्यक्ष, मनसे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS aggressive ON "Wadia 'closed