अविनाश जाधव यांच्यासाठी कृष्णकुंजहून आला तीन अक्षरी खास निरोप

पूजा विचारे
Monday, 3 August 2020

खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांनी आलेल्या नोटीसची दखल घेतली आहे. राज ठाकरेंनी जाधव यांच्यासाठी खास निरोप पाठवला आहे.

मुंबईः मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर ठाण्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले आहे. जाधव यांना पोलिसांकडून २ वर्ष हद्दपार होण्याची नोटीस बजावली आहे. या वादानंतर शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाधव यांनी आलेल्या नोटीसची दखल घेतली आहे. राज ठाकरेंनी जाधव यांच्यासाठी खास निरोप पाठवला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून ते सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. ठाणे महापालिकेच्या कोविड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या मुलींना काढल्याप्रकरणी मनसेकडून शुक्रवारी ठाणे महापालिकेसमोर आंदोलन सुरु होतं. हे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर न्यायालयाने अविनाश जाधव यांना ३ ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत राहण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आज न्यायालय कोणता निर्णय देणार, अविनाश जाधव यांची पोलिस कोठडी वाढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

हेही वाचाः  येत्या 24 तासात मुंबईत कसा असेल पाऊस, जाणून घ्या पावसाचे अपडेट्स

वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. तसंच ठाणे महापालिका मुख्यालयासमोर नर्ससाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असल्यामुळं राज्य सरकारनं बक्षीस दिल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं. 

या सर्व प्रकारानंतर  राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंची भेट घेऊन निघताना बाळा नांदगावकरांना राज ठाकरेंनी एक निरोप अविनाश जाधव यांना द्यायला सांगितला, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. अविनाश जाधव यांना निरोपही पाठवला. 'अविनाश, मै हू ना' अशा शब्दांत राज यांनी जाधव यांना धीर दिला.

अधिक वाचाः मुंबई इज दी बेस्ट...कोरोना रुग्णांना मिळताहेत न्यूयॉर्क पेक्षा दर्जेदार सुविधा

बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर पोस्ट देखील केली आहे. काल अविनाश ला अटक झाली आणि तडीपारची नोटीस देण्यात आली. त्या अनुषंगाने आज सकाळी लोकमान्य पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करून राजसाहेबांकडे गेलो. तिथे अविनाश विषयी सखोल चर्चा झाली आणि साहेबांच्या निर्देशानुसार ठाणे गाठले. ठाणे येथे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राजकारणात विविध पक्ष असतात पण तुम्हाला माहीतच आहे आपला "मनसे परिवार" आहे, आणि परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवारच ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद लाऊन उभा असतो आणि आपले परिवार प्रमुख राजसाहेब हे सर्व अक्षरशः सर्व कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करतात आणि जपतात. अविनाश बद्दल तर ही तळमळ अजून तिव्रतेने मी स्वतः आज अनुभवली. तेथून निघतांना बाकीच्या चर्चेबरोबरच साहेबांनी एकच निरोप अविनाश ला दयायला सांगितला, अविनाश, मै हू ना! यात सगळेच आले.

ठाण्याला जाऊन अविनाश शी भेट झाली, आणि त्याला ठामपणे आम्ही सर्व सोबत आहोत आणि साहेबांचा विशेष संदेश सांगितला. काय ताकद असते ना केवळ तीन शब्द परंतु कार्यकर्त्यांत 100 हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा. जनतेसाठी आमचा लढा हा असाच अविरतपणे कायम राहील, असं बाळा नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

mns chief raj thackeray sent special message avinash jadhav bala nandgaonkar facebook post


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief raj thackeray sent special message avinash jadhav bala nandgaonkar facebook post