मनसे आमदार संतापले, महापालिका आयुक्तांना भेट म्हणून दिली 'ही' वस्तू

पूजा विचारे
Saturday, 15 August 2020

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना भेट म्हणून अनोखी वस्तू दिली आहे. ही भेट देऊन मनसे आमदारानं केडीएमसीचा सावळा गोंधळ उघडकीस आणला आहे. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर विविध प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रसार काहीसा नियंत्रणात आला असला तरी कल्याण डोंबिवली भागात कोरोनाचा प्रार्दुभाव अद्यापही पाहायला मिळतोय. अशातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना भेट म्हणून अनोखी वस्तू दिली आहे. ही भेट देऊन मनसे आमदारानं केडीएमसीचा सावळा गोंधळ उघडकीस आणला आहे. 

कोविडच्या रुग्णांना रेमीडिसीवीर इंजेक्शनची गरज लागते. त्यात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांकडून डॉक्टरांनी रेमीडिसीवीर इंजेक्शन मागून घेतलं. मात्र रुग्णालयामध्ये फ्रीज नसल्या कारणानं हे इंजेक्शन रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांच्या  घरी ठेवण्यास सांगितलं गेलं. या प्रकारामुळे संतापलेले मनसे आमदार राजू पाटील यांनी तेच इंजेक्शन महापालिका आयुक्त ड़. विजय सुर्यवंशी यांना भेट म्हणून दिलेत आणि केडीएमसीचा हा विचित्र कारभार समोर आणला आहे. यावर पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याप्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर जो दोषी आढळेल त्यावर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. 

हेही वाचाः  मुंबईतल्या मृत्यूदरासंदर्भात समोर आली मोठी अपडेट, जाणून घ्या

नेमकं घडलं काय? 

केडीएमसीच्या पाटीदार कोविड सेंटरमध्ये एक रुग्ण काही दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्या रुग्णाच्या उपचारासाठी रेमीडिसीवीर इंजेक्शन लागणार असल्याचं सांगत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांकडून ते इंजेक्शन मागून घेतलं. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नातेवाईकांनी ते इंजेक्शन केडीएमसी रुग्णालयातून आणून दिलं. मात्र कोविड रुग्णालयात फ्रीजची सुविधा नसल्यानं ते इंजेक्शन रुग्णाच्या घरी ठेवण्यात आलं.

अधिक वाचाः  ठाण्यापाठोपाठ पनवेल महापालिकेचा मोठा निर्णय, आजपासून 'या' सुविधा सुरु

त्याचदरम्यान त्या रुग्णाला घरी सोडण्यात येणार आहे. मात्र ते इंजेक्शनचा वापर करण्यात आलेला नाही. किंवा रुग्णाच्या घरी ठेवण्यात आलेलं इंजेक्शन सुद्धा डॉक्टरांनी पुन्हा मागवलं नाही. आता संतापलेले मनसे आमदार राजू पाटील यांनी तेच इंजेक्शन पालिका आयुक्तांना भेट म्हणून दिलं आहे. यावेळी पाटील यांनी कोविड सेंटरमध्ये होणारा सावळा गोंधळ उजेडात आणला. यासोबतच आमदारानं याप्रकारात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. 

या घडलेल्या प्रकारानंतर पालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी याप्रकरणी चौकशी करणार असल्याचं सांगत जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करण्याचं असल्याचं सांगितलं आहे.

mns mla raju patil gift remdesivir injection commissioner vijay suryavanshi covid center


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns mla raju patil gift remdesivir injection commissioner vijay suryavanshi covid center