दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात मनसेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक नवीन दुकाने सुरू झाली आहेत. तर अनेक दुकानदारांनी नूतनीकरण केले आहे. मात्र या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या केवळ इंग्रजीमध्ये लावल्या होत्या.

ठाणे / मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून कोमात गेलेल्या कल्याणमधील मनसेला पुन्हा जाग आली असून मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतल्याचे दिसत आहे. शहरातील इंग्रजी पाट्या असणाऱ्या दुकानांना मनसेने काळे फासत आपला विरोध व्यक्त केला.

कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात गेल्या काही महिन्यात अनेक नवीन दुकाने सुरू झाली आहेत. तर अनेक दुकानदारांनी नूतनीकरण केले आहे. मात्र या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या नावाच्या पाट्या केवळ इंग्रजीमध्ये लावल्या होत्या. नेमका हाच मुद्दा कल्याण शहर मनसेने हाती घेत ज्या दुकानांवर इंग्रजी पाट्या होत्या त्यांना काळे फासत आपला निषेध व्यक्त केला. 

येथील शिवाजी चौक ते मोहम्मद अली चौक परिसरात असणाऱ्या विविध दुकानांच्या पाट्यांना काळे फासत २ दिवसाचे अल्टिमेटम दिल्याची माहिती पत्रकारांना देण्यात आली. यावेळी काही दुकानांवर इंग्रजीबरोबरच मराठी पाट्या असतानाही त्यांना काळे फासल्याचे दिसून आले.

यावेळी झालेल्या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष काका मांडले, माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई, महिला आघाडीच्या शीतल विखणकर, स्मिता खरे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: MNS movement against English boards in shops