
आठवड्याभरात पालिकेकडून काहीच उत्तर न मिळाल्याने थेट कोविड सेंटरवर धडक
Video: मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरमध्ये मनसे आक्रमक
मुंबई: पालिकेने (BMC) उभारलेले गोरेगाव (Goregaon) येथील कोविड सेंटर (Covid Center) अद्यापही दुर्लक्षित आहे. बीकेसी (BKC) येथील कोविड केअर सेंटरमध्ये मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव आहे. काही डॉक्टरमंडळी (Doctors) या कोविड सेंटरमध्येही नियुक्ती केल्यानंतरही दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये काम करायला जात असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या या विचित्र कारभारावर मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी टीका केली होती. तसेच सात दिवसांची वॉर्निंगदेखील (Warning) दिली होती. पण या सात दिवसांत फारसा फरक पडला नसल्याने आज अखेर देशपांडे आणि इतर मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी थेट आक्रमक पवित्रा घेतला. बीकेसी कोविड सेंटरमधील डॉक्टर्सना त्यांनी येथील असुविधेबद्दल जाब (Questions) विचारला. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे एका शिष्टमंडळाने बीकेसी कोविड सेंटरचे डीन राजेश ढेरे (Dean Dr Rajesh Dhere) यांची भेट घेतली. बीकेसी कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे कर्मचारी आहेत असा आरोप मनसेने केला होता. या आरोपानंतर मनसेने ढेरे यांच्याकडून आठवडाभरात स्पष्टीकरण (Clarification) मागवले होते. ते स्पष्टीकरण न मिळाल्याने मनसेचे पदाधिकारी थेट बीकेसी कोविड सेंटरवर धडकले. (MNS Sandeep Deshpande Attacking Mode in Mumbai BMC run BKC Covid Care Centers asks Questions about Irregularities)
संदीप देशपांडे यांनी बीकेसी कोविड सेंटरमधील गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला होता. या विरोधात त्यांनी सात दिवसाचा अल्टीमेटम दिला होता. या संदर्भात थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पालिका आणि कोविड सेंटकडून उत्तर मागितलं होतं. मुंबई महानगर पालिकेच्या बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये अनुभवी डॉक्टर नाहीत. तसेच, या कोविड सेंटरमध्ये नियुक्ती केलेले डॉक्टर हे दुसऱ्या रुग्णालयात नोकरी करतात, याबाबतही त्यांनी जाब विचारला होता. या सर्व प्रश्नांवरून संदीप देशपांडे यांनी कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
सात दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे म्हणाले होते, "आठवडाभर हात जोडून विनंती करतोय. जोडलेले हात सोडायला लावू नका. ज्या कामगारांना कामावरून काढले आहे, त्यांची माफी मागा. तुमचे चुकीचे धंदे जर कोण सांगत असेल, तर त्याला तुम्ही कामावरून काढणार का?" तसेच, लाज बाळगा आणि बीकेसी कोविड सेंटर सुधारा... आम्हाला वेडवाकडं करायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला होता.
"डॉ. डेरेंना आणि कॉन्ट्रेक्टर्सला सांगतोय की पुढच्या सोमवारपर्यंत झालेल्या चुका तपासा आणि दुरूस्त करा. नाही तर जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर धरणे आंदोलन करु. आम्हाला राजकारण करायचे नाही, म्हणून आम्ही आठवड्याभराची मुदत देतोय", असा इशारा देशपांडेंनी आठवड्याभरापूर्वी मुंबई पालिकेला दिला होता. ''जोपर्यंत ही परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करु. पण ते सुधारणार नसतील तर आम्हाला गोंधळ घालावा लागेल. डॉक्टर असल्याची लाज बाळगा, घेतलेली शप्पथ आठवा आणि पेशंट्सना बरे करण्याचे काम करा", असेही देशपांडे त्यावेळी म्हणाले होते.