महाविकास आघाडी सरकारविरोधात मनसेचं आज 'हॉर्न वाजवा' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 12 June 2020

वाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून आज मनसे वाहतूक सेना अभिनव आंदोलन करेल. संध्याकाळी ५ वाजता 1 मिनिटासाठी हॉर्न वाजवण्याचे आवाहन या आंदोलना दरम्यान करण्यात आलं आहे.

 

मुंबई- गेल्या दोन महिन्यापासून मुंबईत लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेत. त्यात वाहतूक व्यवसायही मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारविरोधात मनसे वाहतूक सेना अभिनव आंदोलन करणार आहे. महाविकास आघाडी सरकारविरोधात मनसे आज रस्त्यावर उतरणार आहे. वाहतूक व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येकाचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचावा म्हणून आज मनसे वाहतूक सेना अभिनव आंदोलन करेल. संध्याकाळी ५ वाजता 1 मिनिटासाठी हॉर्न वाजवण्याचे आवाहन या आंदोलना दरम्यान करण्यात आलं आहे.

'निसर्ग'ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये अनेक त्रुटी; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर आरोप

लॉकडाऊनच्या दरम्यान काही निर्बंध शिथिल करताना ओला-उबर सारख्या टॅक्सी सेवांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र या व्यवसायातील अन्य घटकांकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाहतूक क्षेत्राला दिलासा देणारे पाऊल सरकारने उचलावे, अशी आमची अपेक्षा असल्याचं वाहतूक सेनेचे संजय नाईक यांनी म्हटलं आहे. सरकारने वाहतूक क्षेत्राला तातडीने आर्थिक मदत जाहीर करून सावरायला हवे. या सगळ्या प्रश्नांवर सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. या व्यवसायातील सर्वांचा आक्रोश बहिऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचे सोंग घेतलेले सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली. या आंदोलनासाठी मनसेने #MNSHornOKPlease हा हॅशटॅगही तयार केला असून सोशल मीडियावर आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 

काय सांगता! 'पुलं'चं साहित्य आता त्यांच्याच हस्ताक्षरात वाचता येणार; ते कसे वाचा

लॉकडाऊनमुळे टॅक्सी, रिक्षा चालक आणि या क्षेत्रातील इतरांचं अधिक नुकसान झालं. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशात वाहतूक व्यवसाय मेटाकुटीला आला असताना सरकार त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप मनसेनं सरकारवर केला आहे. 

मनसेच्या मागण्या काय 

वाहतूक क्षेत्राला दिलासा देणारे धोरण जाहीर करावे
ओला-उबर प्रमाणे रिक्षा टॅक्सी चालकांना सामान्य प्रवासी वाहतुकीची परवानगी द्यावी
वाहतूक क्षेत्राला आर्थिक मदत जाहीर करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS's 'horn vajava' agitation against Maha Vikas Aghadi government today