साखळीचोरास वाचविणाऱ्या जमावाचा पोलिसांवर हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 10 एप्रिल 2017

दोघांना पकडून परतत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये आरोपी पळून गेले. गेल्या 10 वर्षांत इराणी वसति भागात पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना तब्बल आठव्यांदा घडली आहे

कल्याण - आंबिवली भागातील कुप्रसिद्ध इराणी वसतिमध्ये साखळी चोरास पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर चोराचे नातेवाईक व जमावाने हल्ला केल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

बहुतांशी महिलांचा समावेश असलेल्या जमावाने पोलिस पथकावर जोरदार दगडफेक केली; याशिवाय एका पोलिस कर्मचाऱ्यास अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही सूत्रांनी सांगितले. साखळी चोरास पळून जाता यावे, यासाठी जमावाने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यात एक हवालदार व एक उपनिरीक्षक जखमी झाले आहेत.

उल्हासनगर भागाचे उप आयुक्‍त सुनील भारद्वाज यांना समीर इराणी व हसन इराणी सय्यद हे दोन कुख्यात साखळीचोर इराणी वसतिमध्ये दडून बसल्याची माहिती मिळाली होती. या दोघांना पकडण्यासाठी भारद्वाज 25 जणांच्या पथकासह येथे दाखल झाले होते. या दोघांना पकडून परतत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये आरोपी पळून गेले.

गेल्या 10 वर्षांत इराणी वसति भागात पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची घटना तब्बल आठव्यांदा घडली आहे. दरम्यान इराणी याला ताप आला होता व पोलिस त्याला फसवत असल्याचा दावा त्याच्या कुटूंबीयांनी केला आहे. या प्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mob attacks 26 cops chasing snatchers