मोबाईल टॉवरधारकांनी भिवंडी पालिकेचे थकवले कोट्यवधी रुपये!

मोबाईल टॉवरधारकांनी भिवंडी पालिकेचे थकवले कोट्यवधी रुपये!

भिवंडी : भिवंडी शहरातील विविध इमारतींवर असलेल्या एकूण 224 टॉवर कंपन्यांनी महापालिकेचे 15 कोटी 55 लाख 32 हजार 358 रुपये थकवल्याचे समोर आले आहे. याबाबत पालिकेच्या कर विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी मोबाईल कंपनी टॉवरधारकांना नोटीस देऊन तातडीने कर थकबाकी भरण्याचे आदेश दिले होते.

मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे टॉवरमालक कराची रक्कम भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशाने मोबाईल टॉवर कंपन्यांचे बॅंक खाते गोठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कायदेशीर मान्यता घेऊन आवश्‍यक ती कारवाई सुरू केल्याचे उपायुक्त गुळवे यांनी सांगितले. 

भिवंडी पालिका कार्यक्षेत्रातील 1 ते 5 प्रभाग समितीअंतर्गत नामांकित नऊ कंपन्यांचे 224 टॉवर शहरातील विविध इमारतींवर उभारण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या कंपन्यांनी पालिकेचा कर थकवला. याबाबत कंपनी मालकांना पालिकेकडून करथकबाकीबाबत नोटिसाही बजावण्यात आल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पालिकेच्या विकासकामांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे या टॉवर कंपन्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संबंधित कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई अथवा त्यांची बॅंक खाती गोठविण्याची कारवाई पालिकेच्या वतीने करता येणे शक्‍य आहे, अशी माहिती कर उपायुक्ता वंदना गुळवी यांनी दिली. आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्या आदेशानुसार टॉवर मालक कंपन्यांना नोटिसा दिल्या आहेत. कंपन्यांनी तातडीने थकीत कर भरावा; अन्यथा कायदेशीर मान्यता घेऊन बॅंकेतील खाती गोठविण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराच या नोटिशीद्वारे देण्यात आला आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com