esakal | जमावबंदीच्‍या आदेशाला हरताळ!

बोलून बातमी शोधा

पनवेल भाजी मार्केट

नवी मुंबई, रायगडमधील नागरिक रस्‍त्‍यावर

जमावबंदीच्‍या आदेशाला हरताळ!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.२३ (प्रतिनिधी) : सरकारकडून वारंवार सूचना केल्या जात असूनही पनवेलमधील नागरिक कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत गांभीर्याने घेत नसल्याचे भयावह चित्र सोमवारी सर्वत्र पाहायला मिळाले. जमावबंदीला झुगारून, पोलिसांना न घाबरता अनेक जण रस्त्यावर उतरल्याने जमावबंदीच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून आले. 

हे पण वाचा ः सुरक्षारक्षकांनीही धरला गावचा रस्‍ता 

सध्या अत्यावशक सेवा वगळता इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. अनेक ठिकाणी किराणा मालाची दुकाने, बेकरी, फळ विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने, भाजीपाला विक्री करणारी दुकाने, बॅंका तसेच पेट्रोल पंप आणि रिक्षा सेवा सुरू करण्यात आल्याने शहरातील जवळपास ५० टक्‍क्‍यांच्या वर व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले. राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता रोग प्रतिबंधात्मक कायदा आणि फौजदारी प्रक्रिया कलम लागू करण्यात आला आहे. याअंतर्गत कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई आदेश देण्यात आले आहेत. असे असताना अनेक ठिकाणी एकत्र जमून नागरिकांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली केली जात असल्याचे पाहायला मिळाले.

हे पण वाचा ः एक भीतीदायक अनुभव...अन्‌ २७ वर्षांनी मुंबईत सायरन वाजले! 

गावी जाणाऱ्यांची महामार्गावर गर्दी
घराबाहेर पडू नका, अशा सूचना देण्यात येत असूनही गावी जाण्यासाठी वाहन पकडण्याच्या प्रयत्नात अनेक प्रवासी शीव-पनवेल महामार्गावर खारघर, कामोठे, कळंबोली या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. 

मागच्या दाराने मद्यविक्री

३१ मार्चपर्यंत सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात मद्यविक्री केली जात असून, मद्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. मद्यविक्रेतेही जादा दराने विक्री करत असून मद्य खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली नसल्याचे दिसून आले.  

भाज्यांचे दर चढे 
भाज्यांची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर किलोमागे 10 ते 15 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी 20 ते 30 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो किरकोळ बाजारात सध्या 40 रुपये किलो दराने विकले जात आहेत. तसेच गेल्या आठवड्यात 60 रुपये किलोने विकलेली मटार सोमवारी 120 रुपये किलो दराने विकली जात होती. वांगी, बटाटे आणि दैनंदिन थाळीत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या भाज्यांचे दर वाढवण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.