एक भीतीदायक अनुभव! ...अन्‌ 27 वर्षांनी मुंबईत सायरन वाजले! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

भारत-चीन युद्ध आणि 1993 च्या दंगलीनंतर पहिल्यांदाच मुंबईत सायरन वाजले.

मुंबई : युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाजणारे सायरन एखाद्या आजाराविरोधातील युद्धातही वाजवले जातील, याचा विचारही कोणी केला नसेल; पण मुंबईत गेल्या अनेक वर्षांनंतर एमर्जन्सी सायरन वाजवून अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारत-चीन युद्ध आणि 1993 च्या दंगलीनंतर पहिल्यांदाच मुंबईत सायरन वाजले. 

Corona Virus : पुणे - मुंबई प्रवास करणार आहात? थांबा....

होमगार्ड व नागरी संरक्षण संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांनी नागरी संरक्षण संचालनालयाच्या फोर्ट येथील कार्यालयात हा सायरन वाजवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यूसाठी आवाहन केले होते. त्यासोबतच अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी आवाहनही यांनी केले होते. त्यांच्या आवाहनानुसार मुंबईकरांनी टाळ्या, घंटा, थाळ्या, शंख वाजवून डॉक्‍टर, नर्स, रुग्णालयाचे कर्मचारी, एअरलाईन्सचे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी, मीडिया कर्मचारी, रेल्वे, बस, ऑटो सुविधा पुरवणारे, डोम डिलिव्हरी यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली; पण याच वेळेला फोर्ट येथील होमगार्ड व नागरी संरक्षण विभागातूनही एमर्जन्सी सायरन वाजवून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांनी हा सायरन वाजवला. 

रिक्षा, फेरीवाल्यांना बसलाय कोट्यवधींचा फटका!

मुंबईत 27 वर्षांनंतर अशाप्रकारे सायरन वाजवण्यात आला. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या काळात संचारबंदीचे आदेश देण्यात आले होते. त्या वेळी हा सायरन वाजवला होता. त्यानंतर आता हा सायरन वाजवण्यात आला. नेमका कधी सायरन वाजवण्यात आला होता, ते निश्‍चित सांगता येणार नाही; पण मी दोन वर्षांपासून नागरी संरक्षण विभागात कार्यरत आहे, तेव्हापासून प्रथमच अशा प्रकारे सायरन वाजण्यात आला आहे, असे बुडे यांनी सांगितले. 

राज्यात पाच ठिकाणी आदेश 
1962 मध्ये चीनच्या युद्धानंतर नागरिकांच्या संरक्षणासाठी नागरी संरक्षण संचालनालयाची निर्मिती केली होती. युद्धजन्य अथवा आणीबाणीच्या परिस्थितीत नागरिकांना सूचित करण्यासाठी, सावध करण्यासाठी या विभागातर्फे सायरन वाजवले जातात. राज्याच्या पाच जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने सायरन वाजण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण संचालनालयाचे कार्यालय आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siren plays in Mumbai for 27 years!