esakal | #corona सुरक्षा रक्षकांनीही धरला गावचा रस्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शहरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने तसेच अशा कठीण परिस्थितीत गावी आपल्या कुटुंबासमवेत असावे या विचाराने ही मंडळी गावाकडे निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

#corona सुरक्षा रक्षकांनीही धरला गावचा रस्ता 

sakal_logo
By
अर्चना राणे/बागवान


नवी मुंबई, ता. 23 (बातमीदार) : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शहरातील जवळपास 50 टक्के सुरक्षा रक्षकांनी गावचा रस्ता धरला आहे. शहरात वाढणाऱ्या संसर्गाच्या भीतीने तसेच अशा कठीण परिस्थितीत गावी आपल्या कुटुंबासमवेत असावे या विचाराने ही मंडळी गावाकडे निघाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

शहरातील गृहसंकुल, विविध आस्थापनांमध्ये खासगी कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक पुरवले जातात. त्यातील बहुतांश हे उत्तर भारतीय असून कोरोनाचा संसर्ग गावापर्यंत पोहोचला नसल्याच्या भावनेतून तसेच सगळीकडेच चिंताजनक परिस्थिती असल्याने कुटुंबातील व्यक्तींसोबत असणे गरजेचे आहे, या भावनेतून सुरक्षा रक्षकांनी आपले गाव गाठले आहे. 

त्यामुळे गृहसंकुलांच्या तसेच बऱ्याच आस्थापनांचा सुरक्षेविषयक प्रश्‍न उभा ठाकला आहे. अनेक गृहसंकुलांमध्ये दोन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक कार्यरत होते. तेथे आता एकाच सुरक्षा रक्षकाला पूर्णवेळ ड्युटी करावी लागत आहे. त्याच्यावरच पाणी सोडण्यापासून सोसायटीतील झाडांना पाणी देण्यासारख्या इतर कामांसोबत सोसायटीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद ठेवण्याची जबाबदारीही येऊन पडली आहे. 

हे ही महत्वाचे...महाराष्ट्रात संचारबंदी लागू 
 

याविषयी इंडिया सिक्‍युरिटीचे विजयकुमार गुप्ता यांनी सांगितले, की माझ्याकडच्या बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी गावी जाण्यास सुट्टी देण्याची मागणी केली. ती नाकारताही आली नाही. या कठीण स्थितीत त्यांना त्यांच्या कुटुंबासमवेत राहायचे होते. 

राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही आमच्याकडील सर्व सुरक्षा रक्षकांना 31 मार्चपर्यंत सुट्टी दिली आहे. सगळे उत्तर भारतीय असल्याने ते आपापल्या गावी गेले आहेत. 
- बंडू काळे, काळे सिक्‍युरिटी 

हे ही महत्वाचे...आम्हीही माणसे आहोत 

सीवूडस्‌, वाशी येथील मॉल, कंपन्या आणि गृहसंकुलांमध्ये आम्ही सेवा देतो. ज्या सुरक्षा रक्षकांची घरे जवळ आहेत, असे जवळपास 40 ते 50 टक्के कर्तव्यावर आहेत. इतरांना भरपगारी रजा दिली आहे. गृहसंकुलांमध्ये असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना तेथेच दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय होईल अशी व्यवस्था केली आहे. 
- सुधीर पाटील, स्टेलथ सिक्‍युरिटी