
विरार : वसई-विरार महापालिकेच्या मालकीच्या खोलसपाडा टप्पा 2 धरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून दोन वर्षांत ते पूर्ण करण्याचे ध्येय लघुपाटबंधारे विभागाने ठेवले आहे. त्यामुळे भविष्यात वसई, विरार शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे. या धरणासंदर्भात लघुपाटबंधारे विभाग आणि पालिका आयुक्तांची नुकतीच बैठक झाली आहे. त्यामुळे या कामाला वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वसई, विरार शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यकाळात "सूर्या'चे पाणी वसई-विरारकरांना मिळाले, परंतु या शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पालिकेच्या मालकीच्या देहरजी धरणाचे काम हाती घेतले. ते काम प्रगतिपथावर आहे, परंतु आता पालिकेच्याच मालकीच्या खोलसपाडा टप्पा 2 धरणाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
महत्वाची बातमी : मुंबईत ३ महिन्यांसाठी कोरोना योद्धांची भरती, असा दाखल करा अर्ज
शहरापासून अवघ्या 14 किलोमीटरवर असलेल्या पालिकेच्या मालकीच्या या धरणाचे काम लघुपाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. वन विभागाच्या दोन परवानग्यांपैकी एक परवानगी मिळाली असून दुसरीची परवानगीही लवकरच मिळणार असल्याचे नगरसेवक आणि या योजनेचा पाठपुरावा करणारे प्रफूल्ल साने यांनी सांगितले. वनविभागाला जागा आणि झाडांची नुकसानभरपाई म्हणून 11 कोटी रुपये दिल्यानंतर येत्या दोन महिन्यांत या कामाला सुरुवात होणार आहे. हे बहुजन विकास आघाडीच्या पाठपुराव्याला आलेले यश आहे, असे त्यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
असे आहे धरण
खोलसापाडा हे धरण 36 हेक्टर जागेवर होणार असून यातून रोज 15 एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे; तर धरणाला 51 कोटी रुपये खर्च होणार आहे. सध्या पालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पेल्हार धरणापेक्षा हे धरण दीड पट मोठे आहे. लघुपाटबंधारे विभागाने त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही केली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन, पालिका आयुक्त गंगाधरण डी. पालिका अभियंता राजेंद्र लाड, पाटबंधाराचे उपअभियंता धनराज पाटील, पालिका उपअभियंता प्रदीप पाचंगे यांची बैठक झाली आहे. वन विभाग आणि वन विकास महामंडळाबरोबरही धरणाबाबत बैठक होणार आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी लवकरच होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होऊन धरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
खोळसापाडा टप्पा एकलाही प्रशासकीय मंजुरी
वसई-विरार पालिका क्षेत्रात लोकसंख्या सातत्याने वाढत असून या लोकसंख्येला भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिका वेगवेगळ्या पाण्याच्या योजनांवर काम करत आहे 'सूर्य' पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आल्यानंतर पालिकेने स्वतःचे देहरजी धरण उभारण्याचे काम सुरू केले आहे; तर दुसऱ्या बाजूला राजावली, तिल्हेर व सातिवली या ठिकाणी साठवणतलाव या कामांना गती दिली असतानाच आता खोलसापाडा येथे लघु पाटबंधारे योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याचा ठराव 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला असल्याने वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी भविष्याच्या पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे.
(संपादन : वैभव गाटे)
moment to Kholsapada dam soon Vasai-Virarkars demand for water will be stopped
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.