गंगा नदीच्या नावाखाली कंत्राटदारांना पैसे - डॉ. राजेंद्र सिंह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - गंगा नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली केंद्र सरकार कंत्राटदारांना पैसे वाटत आहे. स्वच्छतेचे हे काम गंगेला अधिक प्रदूषित करणारे आहे, असा आरोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी शनिवारी येथे केला.

मुंबई - गंगा नदीच्या स्वच्छतेच्या नावाखाली केंद्र सरकार कंत्राटदारांना पैसे वाटत आहे. स्वच्छतेचे हे काम गंगेला अधिक प्रदूषित करणारे आहे, असा आरोप जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी शनिवारी येथे केला.

"मै गंगा का बेटा हूँ' अशी घोषणा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. हे काम कंत्राटदारांना दिले आहे; परंतु तीन वर्षे काय 30 वर्षांतही नदी स्वच्छ होणार नाही, असे प्रतिपादन डॉ. सिंह यांनी केले. गोवर्धन इको व्हॅली यांच्या वतीने बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये झालेल्या "नॅशनल वॉटर कॅन्व्हेंशन नेक्‍सस' परिषदेत ते बोलत होते. परिषदेला केंद्रीय मंत्री उमा भारती उपस्थित राहणार होत्या. त्या उपस्थित नसल्याचा उल्लेख करून सिंह म्हणाले की, उमा भारती कुठेही असल्या तरी त्यांनी गंगेच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचे आपले म्हणणे ऐकावे.

डॉ. सिंह यांची मुलाखत मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांच्याकडून नागरिकांना अनेक अपेक्षा होत्या; मात्र गंगेच्या स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी देशवासीयांचा उत्साह पाण्यात बुडवला असल्याची टीका सिंह यांनी केली. नदी स्वच्छ व्हावी आणि राहावी, असे वाटत असेल तर नागरिकांनी तिच्या पात्रात घाण टाकू नये. त्याचबरोबर नदीपासून मैलावाहिन्यांना दूर ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पाण्यावर सर्वाधिक खर्च झाला आहे; तरीही पाण्याअभावी शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्याची अवस्था बिकट आहे. तेथे बेसॉल्ट खडक असल्याने उसाची लागवड करणे अयोग्य आहे. ऊस कारखानदारांची लॉबी मला उसाचा दुश्‍मन समजते; पण मी उसाचा दुश्‍मन नसून पाणीमित्र आहे, असे डॉ. राजेंद्र सिंह यांनी या वेळी स्पष्ट केले.

प्रगतीशील राज्य म्हणून गुजरातचा उल्लेख केला जातो; मात्र गेल्या वर्षी तेथे सर्वांत मोठा दुष्काळ पडला होता. त्याची झळ बसू नये म्हणून सरकारने काहीही केले नाही, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Money in the name of the river Ganga contractors