परदेशवारी केलेल्यांवर 14 दिवस देखरेख 

परदेशवारी केलेल्यांवर 14 दिवस देखरेख 

ठाणे : ठाणे महापालिकेने खबरदारी घेत कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करण्यासाठी तयारी केली आहे. ठाण्याचे रहिवासी असलेले आणि परदेशी प्रवास करून आलेल्या नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून किमान 14 दिवस देखरेखीखाली ठेवले जात आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडून दररोज या रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

महापौर नरेश म्हस्के यांनी या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिरराव यांच्याशी चर्चा करून महापौर दालन येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगांवकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनालीकर व अधिष्टाता शैलेश्वर नटराजन यांच्यासमवेत बैठक घेतली. कोरोनाचा फैलाव झालेल्या देशातून आलेल्या प्रवाशांची ठाण्यात आल्यानंतर तत्काळ भेट घेवून त्यांची चौकशी करून त्यांच्यासोबत 14 दिवस संपर्क साधला जात असल्याचे डॉ. अनिरुध्द माळगांवकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष यंत्रणा कार्यरत केली आहे. 

महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्यास यासाठी कळवा येथील छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयात 8 खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. या कक्षात उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांसाठी दीड हजार "एन 95' मास्क व सुमारे दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे.

या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व याबाबत घ्यावयाची खबरदारी या संदर्भातील माहिती देणारी भीत्तीपत्रके लावण्यात यावी, तसेच वर्तमानपत्रातून देखील याबाबत आवश्‍यक माहिती प्रसिद्ध करावी, असे आदेश यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीत दिले आहेत. 

महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव होवू नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या असून सद्यस्थीतीत उपलब्ध असलेला औषध साठा रुग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. याबाबत महापालिकेने पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणारे उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकांनी पालिकेच्या विविध रुग्णालयातील डॉक्‍टरांना मार्गदर्शन केल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले. 

विमानतळावर संपर्क 
इटली, इराण, थायलंड, साऊथ कोरिया, मलेशिया या ठिकाणी ठाण्यातील अनेक रहिवासी कामानिमित्त जात असतात. अशावेळी एखाद्या रहिवाशाकडून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने संपर्क साधण्यात येत आहे. 

जिल्ह्यात गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी? 
मुंबई, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात "कोरोना व्हायरस'चे संशयित रुग्ण आढल्याने ठाणे जिल्ह्यातही खबरदारीचा निर्णय घेण्यात आला आहे. 
सध्या होळीचा सण जवळ आल्याने या काळात कोणत्याही गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना अथवा जत्रांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. जत्रांबरोबरच मेळावे अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांनाही सध्या परवानगी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे; मात्र याबाबत कोणतेही थेट आदेश काढण्यात आलेले नाहीत; तर केवळ गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, अथवा गर्दीच्या उत्सवात सहभागी होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी भर दिला जाणार असल्याचे कळते. 

दैनंदिन जीवनामध्ये आवश्‍यक काळजी घेतल्यास निश्‍चितच आपण या आजारावर मात करू शकतो. यासाठी सर्व नागरिकांनी विनाकारण घाबरून न जाता स्वत:ची व आपल्या आजूबाजूच्या नागरिकांची काळजी घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. 
- नरेश म्हस्के 
महापौर, ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com