मोनोचा दुसरा मार्ग जुलैपासून?

तेजस वाघमारे
रविवार, 26 मार्च 2017

रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत लवकरच चाचण्या

रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत लवकरच चाचण्या
मुंबई - मोनो रेल प्रकल्पाचा वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा सुरू होऊन तीन वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान धावणाऱ्या मोनोच्या चाचण्या सुरू आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत सुरक्षेच्या अंतिम चाचण्या जूनपासून करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे. या चाचण्या यशस्वी होताच जुलै किंवा ऑगस्टमध्ये मोनो धावण्याची शक्‍यता अधिकाऱ्यांना वाटत आहे.

वडाळा ते चेंबूर या मार्गावर फेब्रुवारी 2014 पासून मोनो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली; मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेलने धावण्याच्या अनेक डेडलाइन चुकवल्या आहेत. आर्थिक आणि तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या मार्गावर काही महिन्यांपासून अंतर्गत चाचण्या सुरू झाल्या आहेत. त्या यशस्वी होत असल्याने एमएमआरडीएने अंतिम चाचण्यांचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मोनो प्रवाशांच्या सेवेत आणण्यासाठी आवश्‍यक असलेल्या चाचण्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत जूनपासून करण्यात येणार आहेत. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर मोनो धावण्याचा मार्ग सुकर होईल.

मोनो रेलच्या स्थानकांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर मोनो सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या ट्रेन आणण्याचे प्रयत्न स्कोमी कंपनी करत आहे. कंपनी आर्थिक संकटात असल्याने ट्रेन मुंबईत दाखल होण्यास विलंब झाला आहे. काही दिवसांपूर्वी 11 क्रमांकाची ट्रेन मुंबईत दाखल झाली असून, इतर ट्रेन लवकरच मोनोच्या ताफ्यात दाखल होतील. या ट्रेनच्या चाचण्या सुरक्षा आयुक्तांमार्फत करण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतरच मोनो पूर्ण क्षमतेने धावेल. चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौकापर्यंत ती धावू लागल्यावर दररोज दीड ते दोन लाख लोक प्रवास करू शकतील, असा अंदाज आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मोनो रेलच्या चाचण्या सुरू आहेत. जूनमध्ये सुरक्षा आयुक्तांमार्फत या मार्गावर चाचणी घेण्यात येईल. चाचण्या यशस्वी झाल्यानंतर या मार्गावर मोनोची सेवा सुरू करण्यात येईल.
- संजय खंदारे, अतिरिक्त आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: mono second route july