मान्सूनचे वेळापत्रक बदलणार?

mansoon
mansoon

मुंबई : जून महिना म्हटलं की पावसाळ्याची सुरुवात हे निसर्गाचे गणित पुढच्या वर्षीपासून बदलण्याची चिन्हे आहेत. वातावरणीय बदलामुळे भारतात मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवासाचा कालावधी लक्षणीयरित्या बदलला असल्याने हवामान विभागाने मान्सूनचे अधिकृत वेळापत्रकच बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अभ्यास व बैठका सुरू असून पुढील वर्षी पावसाळ्यापूर्वी नव्या तारखा जाहीर होण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये सतत हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने भारतीय हवामान विभागाला पुन्हा एकदा मान्सून पॅटर्नचा अभ्यास करण्यास भाग पाडले आहे. मान्सूनचे आगमन, परतीचा प्रवास असो वा मुक्कामाचे दिवसही बदलत आहे. बदलत्या काळानुसार मान्सूनचे वेळापत्रकही बदलू लागले आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर एरव्ही मुंबईत 10 जूनदरम्यान पावसाचे आगमन होणार हे ठरलेले असायचे. यंदा मात्र तब्बल 15 दिवस उशिराने म्हणजेच 25 जूनला मान्सून आला. केरळातही 1 जूनची तारीख चुकवत 6 जूनला मान्सूनने हजेरी लावली. 

मान्सूनमधील बदल ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असल्याचे काही संशोधनातून निष्पन्न झाल्याचे अधोरेखित करत भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी सांगितले की, 1941 पासूनच्या नोंदींवर आधारित मान्सूनच्या आगमन आणि परतीच्या प्रवासाच्या तारखा आपण ठरवलेल्या होत्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनचे आगमन आणि परतीचा प्रवासही काहीसा लांबल्याच्या निष्कर्षापर्यंत आपण आलो आहोत. गेल्या पाच वर्षांपासून हवामान विभागामार्फतही याविषयी अभ्यास केला जात आहे. त्यानुसार मान्सून आगमन आणि परतीच्या नवीन तारखा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. मान्सूनचे हे नवे वेळापत्रक पुढच्या वर्षी जाहीर केले जाईल. 

दहा ते पंधरा मिनिटांत धो-धो 
ऑनसेट मान्सून आणि विद्‌ड्रॉलमध्ये जसा बदल होत आहे; तसा मान्सूनचा ट्रेंडही बदलत आहे. पावसाळ्याचे दिवस कमी होत आहेत. नियमित होणारी संततधार थांबली आहे. त्याऐवजी एखाद्याच दिवशी 10 ते 15 मिनिटांत मुसळधार पाऊस होतो. त्यानंतर पुढचे दिवस कोरडे जातात. मध्य भारतातल्या शहरी भागात हा ट्रेंड प्रामुख्याने जाणवत असल्याचे आयएमडीचे महासंचालक महोपात्रा यांनी नमूद केले. दरवर्षी अशीच स्थिती कायम राहील, अशी शक्‍यता नाही. त्यामुळे आपण त्याला 'ट्रेंड' संबोधले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

फ्लॅश फ्लडची भीती 
दहा- पंधरा मिनिटांत थोडा जरी जोरदार पाऊस झाला तरी सखल भागात पाणी साचत आहे. त्यासाठी पावसाला दोष देण्यात अर्थ नाही. ग्लोबल वॉर्मिंग हा माणसाच्याच करणीचा परिणाम आहे. वाढती लोकसंख्या आणि निसर्गाच्या साखळीत उपद्रव निर्माण करण्यात माणसाची असलेली हातोटी, मोठ्या प्रमाणावर नष्ट केलेल्या पाणथळ जागा; तसेच ड्रेनेज सिस्टिम अद्ययावत न ठेवल्यानेच ठिकठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण होत आहे. पाण्याचा निचरा करणाऱ्या नैसर्गिक संस्थांची जपणूक न केल्यास, नागरी वसाहतींमधील सांडपाण्याचा निचरा करण्यास योग्य उपाययोजनांचा अवलंब न केल्यास हा धोका पुढे वाढणारच असल्याची भीती महोपत्रा यांनी व्यक्त केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com