यंदा ओढणी उडे.. ना! तरुणाईचा हिरमोड; कोरोनामुळे दांडियाचा आवाज बंद

प्रणाली कुऱ्हाडे
Wednesday, 21 October 2020

नवरात्रींच्या काळात नववधू प्रमाणे सजणाऱ्या शहरांमध्ये आता कोरोनाच्या संकटामुळे रात्रीच्या वेळा उजाड झाल्या आहेत.

नेरुळ : ओढोणी ओडो न भले उडे जाय..परी हूं मैं..! या सदाबहार गीतांचे बोल, पाय थिरकायला लावणारे विविध वाद्यांचे संगीत आणि आसमंत उजळून निघणारी रंगी-बेरंगी दिव्यांची रोषणाई नाहीशी झाली आहे. नवरात्रींच्या काळात नववधू प्रमाणे सजणाऱ्या शहरांमध्ये आता कोरोनाच्या संकटामुळे रात्रीच्या वेळा उजाड झाल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सगळीकडेच स्मशान शांतता असल्याने तरूणाई आणि व्यावसायिकांमध्ये निरुत्साह निर्माण झाला आहे.

 अमेझॉनचं ऍप मराठीत येणार, मनसेच्या दणक्याने अमेझॉन नरमली

चीनमधून संपूर्ण जगभरात झपाट्याने फोफावलेल्या कोरोना विषाणूंनी सर्वच क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. देशातील उद्योग-धंदे, उत्साव, लग्न व समारंभांवर पाणी फेरावे लागले आहे. भारताची आर्थिक घडी ही उत्सव आणि सणांशी संबंधित असल्याने त्यालाही चांगलाच फटका बसला आहे. अनेक निर्बंधांत संपन्न झालेल्या गणेशोत्सवानंतर आता नवरात्रींच्या उत्साहावर कोरोनाचे विघ्न निर्माण झाले आहे.

नवी मुंबई आणि पनवेल-उरण भागातील हजारो मंडळांनी नवरात्री उत्सव, देवीचा जागर रद्द केला आहे. जागराच्या निमित्ताने संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत कानठिळ्या बसेपर्यंत वाजणाऱ्या हिंदी-मराठी आणि गुजराती गाण्यांचे ऑर्केस्ट्रा बंद झाले आहेत. मैदानांभोवती होणारी विद्युत रोषणाई, नव-नवीन चेहरे आणि नृत्य बघायला होणारी नागरीकांची गर्दी, रस्त्यावरील भक्तांची रेलचेल आटली आहे. रस्त्याच्या कडेला बसून दांडीया विक्री करणारे फेरीवाल्यांना वाव नसल्यामुळे रंगी-बेरंगी दांडीया, एका बोटावर बेरिंगच्या सहाय्याने फिरवता येणारी दांडीया खरेदी करण्यासाठी उडणारी झुंबड हे सर्व नाहीसे झाले आहे. दिवसभर कॉलेज आणि कामातून आल्यानंतरही एकमेकांची भेट होण्याच्या निमित्ताने मस्त होऊन थिरकणारी तरूणाई आता घरीच बसली आहे. काहींनी ऑनलाईन दांडीया करण्याचा प्रयोग केला खरा, पण तो औटघटकेचाच ठरला. नवरात्र उत्सव हा फक्त परंपरा आणि उत्साहापुरताच मर्यादीत नाही. तर या उत्सावावर ऑर्केस्ट्रा कलाकार, वाद्यवृंद, दांडीया विक्रेते, फॅन्सी कपडे विक्रेते, फॉर्मिंग ज्वेलर्स आदी व्यवसायिकांचे पोट यावर भरत होते. परंतु दांडीयाच रद्द झाल्याने या सर्व घटकांना त्याची मोठी झळ सोसावी लागत आहे.

मुंबईतील BKC जंबो कोविड केंद्राने रचला इतिहास, 10 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

नवरात्रीच्या शेवटची रात्र ही वेशभूषा स्पर्धेची असल्याने बहुतांश जोडपी पारंपारीक आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत गरबा खेळायच्या. त्यामुळे अशा प्रकारचे कपडे भाड्याने देणाऱ्यांचांही धंदा तेजीत असायचा, मात्र कोरोनामुळे तीही संधी हातातून गेली. आमच्याकडे दरवर्षी वेग-वेगळ्या प्रकारचे आणि वेगळ्या धाटनीचे रेडीमेड ड्रेस, राधा-कृष्ण, नव-नवीन ट्रेन्डचे घागरे, नवीन डिजाईनच्या साड्या, लहान मुलाचे वेशभूषाचे कपडे खरेदीसाठी दहा दिवस आधीच दुकानांत खूप गर्दी असायची. बरेच हौशी व्यक्ती चढ्या दरातही कपडे घ्यायचे, मात्र आता कपड्यांच्या दरात घसरण झाल्यानंतरही कोणीच खरेदीसाठी येत नाही असे नेरूळच्या कपडे विक्रेत्या सुजाता गगे यांनी सांगितले. दरवर्षी आम्ही दांडिया सुरु होण्याआधीच गरबा आणि दांडीया रास खेळण्याचा सराव करायचो, पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत पहिला नंबर यावा म्हणून आम्ही न चुकता दांडिया खेळत, पण यावर्षी कोरोनाने सगळेकाही हिरावून घेतले असे महेश यादव या हौशी नागरीकाने सांगितले. 

 

फॉर्मिंग ज्वेलरीची दुकाने ओस

दांडीयाच्या काळात तरूणी आणि विवाहित महिला नऊ दिवस वेग-वेगळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. ज्या रंगाचे कपडे असतात त्याच रंगाला साजेशा अशा दागिने खरेदी करण्याचा तरूणींचा कल असतो. नाकात, कानात, गळ्यातील फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करण्यासाठी महिलांची दुकानांमध्ये गर्दी झालेली असते. परंतू यंदा दांडीया रद्द झाल्याने ग्राहकांनी शहरातील फॉर्मिंग ज्वेलरीच्या दूकानांकडे पाठ फिरवली आहे.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mood of youth Dandiyas voice stopped because of Corona