कोरोना आवाज चाचणीचे 300 नमुने इस्त्रायलला रवाना, आतापर्यंत 1500 हुन अधिकांचे नमुने गोळा

भाग्यश्री भुवड
Friday, 16 October 2020

नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली.

मुंबई, 15 : नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. 40 दिवसांत 1 हजार 500 लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. तर संकलित करण्यात आलेले 300  नमुने इस्त्रायलला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. दरम्यान, एकूण दोन हजार लोकांचे नमुने संकलित करण्यात येणार असून उर्वरित 500 लोकांचे नमुने पुढील 10 ते 15 दिवसांत संकलित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
 
आवाजावरुन स्क्रिनिंग करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 500 रुग्णांचे नमुने, त्यांना कुठला आजार आहे का आदी सविस्तर माहिती पाठवण्यात आली आहे. उर्वरित 1, 500 रुग्णांच्या फक्त आवाजाचे नमुने पाठवण्यात येणार असून केस रिपोर्ट पाठवण्यात येणार नाही. रुग्णांचे घेण्यात येणारे नमुने इस्त्रायलला मेलद्वारे पाठवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. 

महत्तवाची बातमी आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी
 
कोरोना संशयित रुग्णांना शोधण्यासाठी विविध स्क्रिनिंग पध्दतींचा वापर केला जात आहे. यामध्ये ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासणी याचा समावेश आहे. त्यात आणखी एका अत्याधुनिक पध्दतीची भर पडली आहे ती म्हणजे व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग पद्धती. ही पद्धती योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे का याचा गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. नेस्कोतील 2000 पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महत्तवाची बातमी '10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत

अमेरिका आणि इस्त्राईलमध्ये ही पद्धती स्क्रिनिंगसाठी वापरण्यात येते. नागरिकांच्या आवाजावरून केवळ 30 सेकेंदात कोरोनाची लक्षणे आहेत की नाहीत हे समजते. त्यानंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जाते. खूपच कमी वेळात संशयित रुग्णांचा शोध घेता येत असल्याने मुंबईतही हे शक्य आहे का असा विचार पुढे आला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीबरोबर मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका आणि इस्त्रायली कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला असून गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटर मध्ये 5 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.

more than one thousand sound samples collected for covid three hundred sent to israel


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than one thousand sound samples collected for covid three hundred sent to israel