esakal | मुंबईत ८० टक्के पेक्षा जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

बोलून बातमी शोधा

corona virus
मुंबईत ८० टक्के पेक्षा जास्त लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: गेला आठवडाभर मुंबईतील रुग्णसंख्या स्थिर असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. गेल्या आठवडाभरापासून मुंबईत 7 ते 8 हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. त्यासोबत एखाद्या बाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांचे ट्रेसिंगही वाढू लागले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे अधिकाधिक संभाव्य कोरोना रुग्णांच्या तपासणीचे धोरण सध्या राबवले जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यात आले आहे.

पालिकेच्या कोविड डॅशबोर्डच्या आकडेवारीनुसार, मुंबईत कोविड महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील अर्ध्याहून अधिक म्हणजेच जवळपास 51 टक्के लोक हाय रिस्क आहेत. तर, गेल्या 24 तासात केलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पैकी 72 टक्के लोक हाय रिस्कमध्ये होते.

गेल्या एका वर्षापासून आतापर्यंत मुंबईत एकूण 61 लाख 71, 652 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले आहे. त्यापैकी, 31,77,779 म्हणजेच जवळपास 51 टक्के लोक हे हायरिस्क मध्ये आहेत. तर, 29,93,873 म्हणजेच 49 टक्के कमी रिस्क मध्ये आहेत.

काय आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची प्रक्रिया?

61,71,652 ही एकूण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या असून यातील अनेकांवर उपचार होऊन ते बरे ही झालेत. हायरिस्क ट्रेंसिगचे विलगीकरण ही करण्यात आले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये एका रुग्णामागे किती जणांना ट्रेस केले जाते, त्यात हाय रिस्क आणि लो रिस्क किती हे तपासले जाते. अशा रितीने एका रुग्णामागे 12 ते 15 लोकांना ट्रेस केले जाते आणि त्यांना निरीक्षणाखाली ठेवले जातात. एखादा रुग्ण सापडला तर साधारणपणे 48 तासांमध्ये त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व्हायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त 3 दिवसांपर्यत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि इतर सर्व प्रक्रिया झाली पाहिजे.

हेही वाचा: मुंबईत आतापर्यंत इतक्या लाख नागरीकांनी घेतली लस

यानुसार, जवळपास 80 टक्क्यांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पालिकेतर्फे करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

दरम्यान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील हाय रिस्क लोकांच्या चाचण्या केल्या जातात. सौम्य, मध्यम आणि लक्षण नसलेल्या लोकांना त्यांच्या लक्षणांनुसार होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन केले जाते. शिवाय, यातील ज्यांना लक्षण आढळतात त्यांना रुग्णालयांतही दाखल केले जाते. तर, 18 एप्रिल या दिवशी 40,023 एवढे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले. त्यापैकी  28,654 (72%) हे हाय रिस्क गटातील आहेत. तर, 11,369 (28%) हे लो रिस्क गटातील आहेत.

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 5, 86, 692 वर पोहोचला असून त्यातील 4 लाख 86 हजार 622 एवढे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 12 हजार 404 एवढे मृत्यू झाले आहेत. तर, 86 हजार 410 रुग्ण उपचारांधीन आहेत. दरम्यान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील हाय रिस्क लोकांच्या चाचण्या केल्या जातात.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

6,34,220 एवढे होम क्वारंटाईन -

मुंबईत सद्यस्थितीत 6,34,220 एवढे लोक होम क्वारंटाईन आहेत. तर, 1016 एवढे संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 55,36,416 लोकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.

प्रत्येक पॉझिटिव्ह व्यक्तीमागे किमान 20 लोकांचे ट्रेसिंग गरजेचे -

हाय रिस्क म्हणजे किमान 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येणारे लोक, तर 15 मिनिटांपेक्षा कमी वेळ आणि जास्त जवळच्या संपर्कात नसणारे लोक म्हणजे लो रिस्क कॉन्टॅक्ट. प्रत्येक पॉझिटिव्ह व्यक्तीमागे किमान 25 ते 30 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले पाहिजेत. पण, मुंबईत हे प्रमाण आधीपासूनच कमी आहे. शिवाय, चाचण्यांची क्षमता ही तेवढीच पाहिजे. आता सध्या 50 ते 60 हजार चाचण्या केल्या जातात. पण, त्यासाठीही किट्स, मनुष्यबळ, प्रयोगशाळांची गरज लागते. जर दरदिवशी 8 किंवा 10 हजार रुग्ण सापडत असतील आणि 50 हजार चाचण्या केल्या जात असतील तर एका पॉझिटिव्ह रुग्णामागे फक्त 7 किंवा 8 लोकांचे ट्रेसिंग करुन चाचण्या केल्या जातात. हा आकडा किमान 15 ते 20 चाचण्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. केंद्र सरकारच्या नियमानुसार किमान प्रत्येक व्यक्तीमागे किमान 30 चाचण्या झाल्या पाहिजेत पण, आता रुग्णसंख्या वाढल्याने आपण फक्त 7 ते 9 लोकांचे ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्यामुळे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असे राज्य कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.