esakal | तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

बोलून बातमी शोधा

Amruta-Fadnavis-Tanmay-Fadnavis
तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लस तुटवडा जाणवत आहे. राज्याच्या लसीकरणाला ब्रेक लागण्याची वेळ गेल्या काही दिवसात राज्यावर आली आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या २३ वर्षीय पुतण्याने लस घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. तन्मय फडणवीस हा देवेंद्र फडणवीस यांचा नातेवाईक असून त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. त्यावरुन त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. लसीकरणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांच्या निकषामध्ये तन्मय मोडत नाही, मग त्याला लस कशी काय दिली? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळी विचारताना दिसत आहेत. तशातच अमृता फडणवीस यांनीही या वादात उडी घेत ट्वीट केलं.

हेही वाचा: "लॉकडाउन संपू दे, मग देवेंद्र फडणवीसांना..."

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी तन्मय फडणवीस प्रकरणावर भाष्य करताना, 'हा विशेषाधिकार असावा', असा खोचक टोला लगावला. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी या मुद्द्यावर ट्वीट केलं. "कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही राजकीय शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणांच्या आधारावर असायला हवी. कोणीही नियम किंवा कायद्यापेक्षा मोठा नाही. (तन्मय प्रकरणात) जे कायद्याच्या चौकटीत योग्य आहे ते केलं जायला हवं. आम्ही नेहमीच न्यायाच्या बाजून उभे आहोत! आम्ही या मुद्द्यावर आपल्यासोबत आहोत. कृपया याबद्दल योग्य ती कारवाई केली जावी, म्हणजे भविष्यात नियमाबाह्य पद्धतीने होणाऱ्या कृत्यांना आळा घालता येईल", असं ट्वीट त्यांनी केलं. या ट्वीटसोबत त्यांनी तन्मय फडणवीस हा हॅशटॅगदेखील पोस्ट केला.

हेही वाचा: तन्मयच्या लसीकरणावरुन वाद, देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

काँग्रेसने काय केला सवाल

“४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आहे.

हेही वाचा: फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...

"तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याने कोरोना लस कोणत्या निकषात घेतली, याची मला माहिती नाही. ती जर मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे असेल तर हरकत नाही. पण पात्रतेच्या निकषात नसेल, तर सर्वथा अयोग्य आहे. निकषात पात्र नसल्याने माझी पत्नी आणि मुलगी यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. आज जरी १८ वर्षांपेक्षा सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी नियम सर्वांनीच पाळलेच पाहिजे, हे माझे ठाम मत आहे", अस स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.