esakal | धक्कादायक! तरुणीच्या मृतदेहाऐवजी पालकांकडे दिला तरुणाचा मृतदेह;गायब झालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं   
sakal

बोलून बातमी शोधा

mortal body

वाशी इथल्या महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख या २९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह गायब झाला होता. मात्र आता या प्रकरणाचं गूढ उकललं आहे.  

धक्कादायक! तरुणीच्या मृतदेहाऐवजी पालकांकडे दिला तरुणाचा मृतदेह;गायब झालेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं   

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  वाशी इथल्या महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख या २९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह गायब झाला होता. मात्र आता या प्रकरणाचं गूढ उकललं आहे.  

त्याचा मृतदेह तरुणीचा असल्याचं समजून तो एका  मृत तरुणीच्या नातेवाईकांना दिला गेल्याचं तपासात आढळुन आलं आहे. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील सदर मृतदेह आपल्याच मुलीचा आहे अशी खातरजमा न करता उमर शेख याच्यावर हिंदु पद्धतीनं अंत्यसंस्कार केल्याचं आढळुन आलं आहे. हा सर्व प्रकार महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे उघड झालंय. त्यामुळे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: कोरोना संसर्गाची व्याप्ती समजून घेण्यासाठी होणार 'सिरो-सर्व्हे'; जाणून घ्या  'सिरो-सर्व्हे' म्हणजे काय?
  
उलवेच्या वहाळ गावात राहणाऱ्या उमर शेख या व्यक्तीचा ९ मे ला रहात्या घरात आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन व कोव्हीड तपासणीसाठी महापालिकेच्या वाशी इथल्या रुग्णालयात पाठवून दिला होता. चार दिवसानंतर उमर शेख याची कोव्हीड टेस्ट निगेटीव्ह असल्याचं आढळुन आल्यानंतर गेल्या शनिवारी उमरचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे नातेवाईक रुग्णालयात गेले होते, मात्र शवागरात उमरचा मृतदेह नसल्यामुळे रुग्णालय प्रशासनानं उमरच्या नातेवाईकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं. मात्र दुसऱ्या दिवशी देखील शवागारात उमरचा मृतदेह न सापडल्यामुळे उमरचा मृतदेह शवागारातून गायब असल्याचं रुग्णालयाकडून त्याच्या नातेवाईकांना सांगण्यात आलं. 

शवागरातून मृतदेह अशा पद्धतीनं गायब झाल्याचं आढळुन आल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं रविवारी सायंकाळी वाशी पोलिस  ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दाखल केली होती.  सदर तक्रारीच्या अनुषंगानं वाशी पोलिसांनी रुग्णालय आणि शवागारात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची रात्री उशीरापर्यंत तपासणी केली. या तपासणीत रुग्णालयानं हलगर्जीपणा दाखवत कावीळमुळे मृत पावलेल्या दिघा इथल्या १८ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह असल्याचं समजून उमर शेख याचा मृतदेह तीच्या नातेवाईकांना दिल्याचं आढळुन आलं आहे. 

हेही वाचा: ऑनलाईन दारू मागवताय; एकाची अशी झाली ५० हजारांची फसवणूक..वाचा बातमी

मुलीचा मृतदेह समजून हिंदू पद्धतीनं केले अंत्यसंस्कार: 

मृत तरुणीच्या नातेवाईकांनी आपल्या मुलीचा मृतदेह असल्याचं  समजून उमर शेख याच्या मृतदेहावर हिंदू पद्धतीनं अंत्यसंस्कार देखील करुन टाकले. अंत्यसंस्कारापुर्वी सदर तरुणीच्या नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा उघडला होता. मात्र महापालिका रुग्णालयाने १० दिवसानंतर सदर तरुणीचा मृतदेह दिल्यानं १० दिवसात तरुणीचा चेहरा खराब झाला असावा, असा समज करुन सदर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं मृत तरुणीच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. तर तरुणीचा मृतदेह अद्याप शवागरात पडून असल्याचं आढळुन आलं आहे. 

तरुणाचे नातेवाईक हैराण: 

 दुसरीकडे उमरचा मृतदेह न मिळाल्यानं त्याचे नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून वाशीतल्या महापालिकेच्या रुग्णालयात आणि वाशी पोलिस ठाण्यात खेटे घालत आहेत. उमरचा मृतदेह आम्हाला देण्यात यावा, आम्ही त्याच्यावर आमच्या पद्धतीनं अंत्यसंस्कार करु अशी विनवणी रुग्णालयाकडे करत आहेत. मात्र शवागरात उमरचा मृतदेहच नसल्यानं कराचं काय? असा प्रश्न महापालिका रुग्णालय प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे महापालिका रुग्णालय प्रशासनाकडून मृत उमरच्या नातेवाईकांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.   

हेही वाचा: राज्यातले आरटीओ कार्यालय होणार सुरु; फक्त 'या' वाहनांचं होणार रजिस्ट्रेशन.. 

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी करायला सुरुवात केली आहे. 

mortal body of a boy given to another family by NMMC hospital navi mumbai read full story  

loading image