सर्वाधिक श्रीमंत व्‍यक्‍ती देशात मुंबईमध्‍ये जास्त; कुबेरनगरीचे स्थान कायम | | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rich people in Mumbai

सर्वाधिक श्रीमंत व्‍यक्‍ती देशात मुंबईमध्‍ये जास्त; कुबेरनगरीचे स्थान कायम

मुंबई : कुबेरनगरी हे स्थान मुंबईने (Mumbai) कायम राखले असून देशात सर्वाधिक अतीश्रीमंत (Rich People) (चोवीसशे कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक) व्यक्ती मुंबईत असल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. पुढील पाच वर्षांत ही संख्या तीस टक्क्यांनी वाढण्याचाही अंदाज आहे. एका रिअल इस्टेट (Real estate) सल्लागार संस्थेच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. देशाची आर्थिक-व्यापारी राजधानी म्हणून मिरविणाऱ्या मुंबईतील (Mumbai) जागांचे वाढते दर पाहता सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती मुंबईत असतील या चर्चेवर या अहवालाने शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबईत वर्ष २०२१ मध्ये १,५९६ अतीश्रीमंत (अल्ट्रा हायनेटवर्थ) व्यक्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ज्यांची संपत्ती तेहतीस कोटी अमेरिकी डॉलरपेक्षा (२,४४२ कोटी रुपये) जास्त असते त्यांना अतीश्रीमंत म्हटले जाते. इतकेच नव्हे तर पुढील पाच वर्षांत म्हणजे सन २०२६ पर्यंत ही संख्या २९.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

त्यावर्षी ही संख्या २,०६९ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. सन २०१६ मध्ये मुंबईत १,११९ अतीश्रीमंत व्यक्ती होत्या. पाच वर्षांत ही संख्या ४२.६ टक्क्यांनी वाढली. २०२१ मध्येच ही संख्या मागीलवर्षीच्या तुलनेत ११ टक्के वाढली, असे यासंदर्भातील अहवाल जाहीर करणाऱ्या नाईट फ्रँक चे अध्यक्ष शिशिर बैजल म्हणाले.

टॅग्स :Mumbai Newsrich people