
गुगल माईंड प्राध्यापिकेच्या सतर्कतेने घर सोडून पळालेली खुशी स्वगृही परतली
उल्हासनगर -आई फोन वर रागावल्याने 11 वर्षीय खुशीने दुपारी दोन वाजता घर सोडले.पोलीस आणि उल्हासनगर मधील जागृत नागरिकांनी तिचा तपास सुरू केला. सायंकाळी कामावरून घरी चाललेल्या प्राध्यापिकेने लोकल मध्ये खुशीशी संवाद साधला.एकट्या प्रवास करणाऱ्या खुशीच्या वर्तनावर शंका उपस्थित करीत गुगल वरून शाळेचा क्रमांक मिळवत खुशीला पोलिसांच्या मदतीने पालकांपर्यंत पोहचविले.
उल्हासनगर कॅम्प 3 मधील सम्राट अशोक नगर मधील लोकसेवा सोसायटी मध्ये राहुल शिरसाट हे कुटुंबासह राहतात. त्यांना 11 वर्षाची मुलगी खुशी आहे. खुशीची आई प्रियांका ही कामाला गेलेली असताना खुशीची तक्रार करण्यासाठी आईने त्यांना फोन केला. तेव्हा कामावरून आल्यावर तुला बघते असा दम भरल्याने घाबरलेल्या खुशीने दुपारी दोन वाजता घर सोडले. कोणाला काही एक न सांगता निघून गेल्याने घाबरलेल्या खुशीच्या आजीने प्रियांका याना फोन करून सांगितले. खुशीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे अन्वेषण पथकाला तिला शोधण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ती गौशाळेच्या बाजूने उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या दिशेने खुशी जाताना दिसली.
खुशीने दुपारची कर्जत लोकल पकडून कर्जत गाठले. आणि त्याच लोकल मधून कर्जत वरून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. कर्जतच्या कोकण ज्ञानपीठ इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या शितल गणपत बोरिटकर ह्या त्याच लोकलने बदलापूरला घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या खिडकीजवळ बसल्या असल्याने खुशीने त्यांच्याकडे जाऊन खिडकी जवळची जागा मागितली. तसेच अंधेरी आल्यावर सांगा मला उतरायचे आहे असे खुशी म्हणाली. त्यामुळे शितल याना शंका आली आणि शितल यांनी खुशीची विचारपूस सुरू केली.
खुशी ही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शितल यांनी अधिक सविस्तर विचारले. मात्र तिने मौन धारण केलेले असताना ही शितल आणि त्यांच्या मैत्रिणीनी तिच्याशी संवाद साधत ती जसलोक शाळेत असल्याची माहिती काढली. ह्या माहितीच्या आधारे शितल यांनी जसलोक शाळेचा गुगल वरून क्रमांक काढला. त्या नंबर वरून शाळेच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधत राहुल शिरसाट यांचा नंबर मिळवला आणि त्यांशी संवाद साधत खुशीला घेऊन नेरळ येथे असल्याचे सांगितले.
खुशीच्या शोधात असलेल्या मध्यवर्ती पोलिसांनी थेट नेरळ गाठत शितल याना भेटले. तेव्हा शितल यांनी खुशीच्या ताबा पालकांना देणार असे सांगत. थेट पोलिसांबरोबर उल्हासनगरचे मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. खुशीला पाहून तिच्या आजी आणि आईचा अश्रूंचा बांध फुटला, त्यांनी शितल यांच्या पाया पडत आभार मानले. शितल यांच्या समयसुचकतेमुळे खुशी सुखरूप पालकांकडे पोहचली, असेच सर्व नागरिक जागरूक राहिल्यास लहान मुले सुरक्षित होतील, असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला.
पोलिसांनी केला प्राध्यापिकेचा सत्कार
खुशीला घेण्यासाठी आलेले सर्व पोलीस हे कर्मचारी हे पुरुष होते. त्यामुळे शितल यांनी स्वतः खुशी बरोबर मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. सायंकाळी 5 ते रात्री 9 हा मौल्यवान वेळ शितल यांनी अनोळखी असलेल्या खुशीसाठी दिला. यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पुष्पगुच्छ देऊन शितल यांचा सत्कार केला. तसेच रात्री उशिर झाला असल्यामुळे पोलीस गाडीने बदलापूर मधील रमेशवाडी येथील घरी शितल याना पोहचविण्याची सोय केली.
Web Title: Mother Angry Over Phone On 11 Year Old Girl Leave Home Google Mind Professor Vigilance Get Back Her Home Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..