मोतीलालनगरला म्हाडाचा पुनर्विकास अमान्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

स्वतःच पुनर्विकास करण्याचा रहिवाशांचा निर्धार.

मुंबई ः गोरेगाव पश्‍चिम येथील मोतीलालनगरच्या (क्र. एक, दोन व तीन) पुनर्विकासाचा प्रस्ताव रहिवाशांनी फेटाळला असून वसाहतीचा पुनर्विकास स्वतःच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. म्हाडाच्या सर्वेक्षणालाही आमचा विरोध राहील, असेही रहिवाशांनी स्पष्ट केले आहे. पुनर्विकासात रहिवाशांना ९६८ चौरस फूट घर मिळणार असले, तरी चौदाशे चौरस फुटांच्या घराची मागणी त्यांनी केली आहे. 

मोतीलालनगरमधील चार हजार बैठ्या घरांच्या पुनर्विकासासाठी म्हाडा येत्या रविवारपासून (ता. १८) सर्वेक्षण सुरू करणार आहे. म्हाडाच्या पुनर्विकास प्रस्तावावर विचार करण्यासाठी रविवारी (ता. ११) रहिवाशांची सभा झाली. म्हाडाचा हा प्रस्ताव अन्यायकारक असून  निर्णय घेताना म्हाडाने आम्हाला विश्‍वासात घेतले नाही. शेजारच्या सिद्धार्थनगरच्या रहिवाशांचे जसे हाल झाले, तसे आमचे होऊ नयेत म्हणून आमचा पुनर्विकास आम्हीच करू, असे या वेळी ठरविण्यात आले. मोतीलालनगर रहिवासी विकास संघातर्फे आयोजित केलेल्या सभेला माधवीताई राणे, वास्तुविशारद रजनीश बर्वे, आप्पासाहेब केकाणे, मल्हारी भिसे, पंढरीनाथ वानखेडे, सालौद्दिन खान, श्रीधर राणे, वीरेंद्र जाधव, सुखदेव कारंडे, दत्ताराम जाधव, अनंत लांजेकर, लालजी भाई, विजय अहिरे, राजकुमार अहिरे, प्रकाश जाधव, सुधाकर रूपवते, गौरव राणे आदी सर्वपक्षीय प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुनर्विकासाबाबत रहिवासी विकास संघाच्या प्रतिनिधींची नुकतीच म्हाडाचे सभापती मधु चव्हाण व अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. पुनर्विकासात मोतीलालनगरवासीयांना ९६८ चौरस फुटांचे नवे घर देण्यात येणार आहे. पण या प्रक्रियेत रहिवाशांच्या हक्काचा वाटा विकसकाला मिळणार असल्याचेही रहिवाशांना सांगितले.  

यामुळे रहिवाशांचा विरोध
चार हजार घरांच्या पुनर्विकासात रहिवाशांसाठी समाजमंदिर नसेल, एकच क्‍लबहाऊस मिळेल व दोन घरांमागे एक पार्किंग मिळेल, तसेच रहिवाशांना कॉर्पस फंड मिळणार नाही. या बाबी लक्षात आल्यामुळे रहिवाशांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. सर्वेक्षणासाठी म्हाडाने आम्हाला विश्‍वासात घेतले नाही व आम्हाला लेखी कळवलेही नाही. त्यामुळे आता आम्ही म्हाडाच्या सर्वेक्षणालाही विरोध करू, असेही रहिवाशांनी सभेत सांगितले.

सर्वेक्षणासाठी २० कोटींचे कंत्राट
गोरेगावच्या मोतीलालनगरातील वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. म्हाडाकडे स्वत:चे वास्तुविशारद (आर्किटेक्‍ट) असतानाही मोतीलालनगरचा सर्व्हे करण्यासाठी २० कोटी रुपये खर्चून पी. के. दास कन्सल्टन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. त्याविषयीची उलटसुलट चर्चा म्हाडा कार्यालयात सुरू आहे. 
मोतीलालनगर वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार आहे. तो करताना म्हाडाला सुमारे ४० हजार घरांचा स्टॉक उपलब्ध होणार आहे. मात्र वसाहतींच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम खासगी कंपनीला दिल्याने, म्हाडाचे सुमारे २० कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहेत. यापूर्वी म्हाडाच्या आर्किटेक्‍टने अनेक प्रकल्पांसाठी सर्व्हे केला आहे. मग मोतीलालनगरच्या सर्व्हेसाठी खासगी आर्किटेक्‍ट नेमण्याचे कारण काय, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

चांगले काम  करण्याचा प्रयत्न
जगात मोठमोठे प्रकल्पांचे काम करताना खासगी कन्सल्टंट नेमले जातात. पालिका किंवा इतर प्राधिकरण आपले प्रकल्प पूर्ण करताना अशाच पद्धतीने सल्लागार नेमतात. त्यात कुणा अधिकाऱ्यांवर विश्‍वास नाही, असे म्हणता येणार नाही. काम वेळेत आणि चांगले करण्याचा प्रयत्न आहे. मोतीलालनगरच्या पुनर्विकासासाठी पी. के. दास कन्सल्टन्सीला काम देणे गैर नाही, असे स्पष्टीकरण म्हाडा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: motilal nagar citizens oppose mhada redevelopment proposal