मोटरमनच्या आंदोलनामुळे प्रवासी वेठीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मुंबई - जादा वेळ काम करण्यास नकार देत रेल्वे प्रशासनाशी असहकार पुकारणाऱ्या मध्य रेल्वेच्या मोटरमनमुळे मुंबईतील प्रवाशांना शुक्रवारी नाहक मनस्तापास सामोरे जावे लागले. मोटरमनच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.

लोकल सुमारे 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे अनेक नोकरदारांना लेटमार्कला सामोरे जावे लागले. प्रशासनाने मागण्या मान्य केल्यानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनादरम्यान मोटरमन नियमित कामाच्या तासांत सेवा बजावत होते; मात्र त्यांनी ओव्हरटाइम करण्यास नकार दिल्याचा फटका लोकल सेवेला बसला. सर्वच स्थानकांत प्रवाशांची गर्दी उसळली होती.

आंदोलनामुळे सकाळी रुळांवर लोकलच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून उतरून रुळांवरून पायपीट करावी लागली. दरम्यान, जादा वेळ काम करण्यास नकार दिल्यामुळे कल्याणमधील काही मोटरमनना नोटीस बजावण्यात आली आहे.

दादर स्थानकात चेंगराचेंगरी
मोटरमनच्या आंदोलनामुळे लोकल उशिरा धावत असल्याने सर्वच स्थानकांत गर्दी उसळली होती. परळ स्थानकात "आरपीएफ' व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान प्रवाशांना दोन्ही दिशेने रांगेत सोडत होते; मात्र दादर स्थानकात झालेल्या गर्दीमुळे फलाट क्रमांक 1 आणि 2 वर चेंगराचेंगरी झाली. त्यादरम्यान काही प्रवासी रुळांवर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: motorman agitation