मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

मुंबई युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशनने (मुनोवा) प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात बुधवारी (ता. 28) फोर्ट कॅम्पसमध्ये लाक्षणिक आंदोलन केले. 

मुंबई: युनिव्हर्सिटी ऑफिसर्स वेल्फेअर असोसिएशनने (मुनोवा) प्रलंबित मागण्यांसाठी मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात बुधवारी (ता. 28) फोर्ट कॅम्पसमध्ये लाक्षणिक आंदोलन केले. प्रशासनाने प्रशासकीय पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर केला असून त्यात काही अधिकाऱ्यांवर मेहेरनजर करण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यांसह विविध मागण्यांबाबत प्रशासन सकारात्मक नसल्याने कुलपती आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची भेट घेण्यासाठी परवानगी मागणारे पत्र शिष्टमंडळाने विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना दिले. 

बदली, पदोन्नती, "सीसीएफ'मधील अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी तसेच सहायक कुलसचिव समकक्ष असूनही ती वेतनश्रेणी लागू न करणे, परीक्षा संचालक व कुलसचिव या पदाचा अधिभार पात्र उपकुलसचिवांना न देणे अशा विविध मागण्या संघटनेच्या आहेत. तसेच प्रशासनाने प्रशासकीय पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यातील काही तरतुदींना "मुनोवा'चा विरोध आहे. ही प्रशासकीय पुनर्रचना अशास्त्रीय आहे. यात काही अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. 

काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे; तर काहींवर विशेष मेहेरनजर करण्यात आली आहे. यात अधिकाऱ्यांना विश्‍वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे "मुनोवा'ने स्थगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले आहे. या आंदोलनाला मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने सक्रिय पाठिंबा दिला आहे. आंदोलनात विद्यापीठातील सर्व अधिकारी सहभागी झाले होते. 

अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. विद्यापीठाच्या संकटकाळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र काम करून परीक्षेचे निकाल वेळेत लागण्यास हातभार लावला, परंतु प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. हे प्रश्‍न वेळेत सोडवले नाहीत, तर अधिकारी कुलपतींकडे दाद मागणार आहेत. 
- दीपक वसावे, 
अध्यक्ष, "मुनोवा' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of officers of Mumbai University