काय चाललंय विद्यापिठाचं! पीएचडीच्या विद्यार्थ्यांना करावं लागतंय फेलोशिपसाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभरापासून फेलोशिप मिळाली नाही. ती तातडीने मिळण्यासाठी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता.11) मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन पुकारले.

मुंबई : मुंबई विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभरापासून फेलोशिप मिळाली नाही. ती तातडीने मिळण्यासाठी 50 ते 60 विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता.11) मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन पुकारले. जोपर्यंत फेलोशिपमध्ये वाढ करून मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

 व्हिडीओ कॉन्फरंसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश...

गतवर्षी आंदोलन केल्यानंतर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने फेलोशिप दिली होती. या वर्षी फेलोशिप सुरळीत मिळेल, अशी अपेक्षा असताना विद्यापीठाकडून मात्र विद्यार्थ्यांना एप्रिल 2019 पासून फेलोशिप मिळालेली नाही. पीएचडीचे विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने त्यांना मिळणाऱ्या फेलोशिपच्या पैशातून शिक्षण शुल्क, वसतिगृह, खानावळ, प्रबंधासाठी लागणारा खर्च भागवला जातो; परंतु वर्षभरापासून विद्यापीठाकडून फेलोशिप न मिळाल्याने विद्यार्थ्यांना हा खर्च भागवण्यात अडचणी येत आहेत; त्याचा अभ्यासावर परिणाम होत आहे. 
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पामध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी 3 कोटी 24 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

भीषण ! परदेशात वापरलेले N95 मास्क धुवून विक्रीसाठी आणलेत भिवंडीच्या गोदामात

विद्यापीठाकडून वेळेवर मिळत नसलेली फेलोशिपही तुटपुंजी स्वरूपाची आहे. सरकारच्या नव्या अध्यादेशाप्रमाणे, पहिल्या वर्षी 14 हजार, दुसऱ्या वर्षी 16 हजार आणि तिसऱ्या 18 हजार रुपये फेलोशिप मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मुंबई विद्यापीठाकडून केवळ आठ हजार रुपयेच फेलोशिप मिळत आहे. अन्य विद्यापीठांत नियमानुसार फेलोशिप मिळत असताना मुंबई विद्यापीठाकडून देण्यात येत असलेली तुटपुंजी फेलोशिपही बंद करण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने गतवर्षीची फेलोशिप तातडीने देण्याबरोबरच नियमानुसार असलेली वाढीव फेलोशिप देण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील आंबेडकर भवनसमोर आंदोलन पुकारले. विद्यापीठाच्या कुलगुरू तसेच प्र-कुलगुरूंकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात येत असून विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

 Movement of PhD Students for Fellowship, mumbai univercity


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of PhD Students for Fellowship, mumbai univercity