व्हिडीओ कॉन्फरंसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश...

व्हिडीओ कॉन्फरंसिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश...

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्वाचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी. यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

  • विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळले मात्र त्यांच्यात आढळून आलेली नाही. त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे. मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाही. परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झाला आहे. कालपासून राज्यात तपासणी अधिक तीव्र करण्यात आली असून विविध देशांच्या दुतावासांशी देखील चर्चा केली जात आहे.

  • नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये

जी मुख्य शहरे आहे तेथील टुर ऑपरेटर्सनी शहरातील परदेशी गेलेल्या पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली पाहिजे. जे पर्यटक परतणार आहे त्यांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये असा संदेश द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत म्हणून नागरिकांनी घाबरुन तपासणीसाठी रांगा लावू नये. अधिकची खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यस्तरावर याबाबत दर दोन तासांनी आढावा घेत असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, चाचणी करण्याची सुविधा केंद्र शासनाच्या मान्यतेने केली जाते. त्यामुळे केंद्र शासनाने परवानगी दिल्यानंतर प्रयोगशाळेला मंजुरी दिली जाईल. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. कोरोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

  • सात देशातून आलेल्या प्रवाशांना 100 टक्के क्वॉरंटाईन करावे

प्रशासनाला निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून 15 फेब्रुवारीनंतर ज्यांनी प्रवास केला आहे आणि ते देशात परतले आहे त्यांना सक्तीने 15 दिवस घरीच स्वतंत्र राहण्याच्या सूचना द्याव्यात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार या सात देशातून आलेल्या व येणाऱ्या प्रवाशांचे 100 टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे. पुणे, मुंबई, नागपूर येथे कशाप्रकारची क्वॉरंटाईन सुविधा केली आहे याची माहिती महापालिका आयुक्तांनी तातडीने द्यावी. अन्य शहराच्या महापालिका आयुक्तांनी देखील अशाप्रकारची माहिती उद्यापर्यंत देण्याबाबत मुख्य सचिवांनी सांगितले.

  • शासकीय कार्यक्रम रद्द करा

यात्रा, सामूदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. कोरोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकींग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागा येथे स्वच्छता ठेवा. जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा.

  • प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा

बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. प्रत्येक गावासाठी एसओपी तयार करा. पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचना मुख्य सचिवांनी यावेळी केल्या.

  • प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरु करावा

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यावेळी म्हणाले, केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 7 देशातील जे प्रवाशी उद्यापासून परतण्यास सुरुवात होणार आहे त्यांना क्वॉरंटाईन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्था करावी. परदेशातून प्रवास करुन आलेले व ज्यांना लागण झाली अशा प्रवाशाच्या संपर्कात आलेल्या निकटवर्तीयांची तपासणी केली जाईल. या निकटवर्तीयांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:च घरी विलग राहावे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष सुरु करावा. सर्वसामान्य नागरिकाला तातडीने चाचणी करण्याची आवश्यकता नाही. ज्या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले परंतु त्यांच्यात लक्षणे आढळून आली नाही त्यांना रुग्णालयात क्वॉरंटाईन करावे. क्वॉरंटाईनची सुविधा ही रुग्णालयापासून दूर करावी. विलगीकरणाची सुविधा मात्र रुग्णालयात असावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान यावेळी औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, कोकण आणि पुणे विभागीय आयुक्तांनी विभागात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच क्वॉरंटाईन  आणि विलगीकरणासाठी राखीव केलेल्या जागांबाबत माहिती दिली.

CM uddhav thackeray gave orders to all officers in video conference 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com