सुप्रिया सुळे मांडणार रहिवाशांची भूमिका; करणार आरे मेट्रो कारशेडची पाहाणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

मुंबई पालिकेने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ही या निर्णयाला मंजुरी दिली आहे.

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे उद्या (रविवार) आरे कॉलनीला भेट देऊन "मेट्रो कारशेड"ची पाहणी करणार आहेत. रविवारी दुपारी 12 वाजता त्या आरे कॉलनीत जाणार असून यावेळी त्या कॉलनीतील रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या भावना ही जाणून घेणार आहेत.

मुंबई पालिकेने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2700 झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीने ही या निर्णयाला मंजुरी दिली आहे. असं असलं तरी वृक्ष प्राधिकरण समीतीमधील तज्ञ सदस्यांसह सामाजिक संस्था, पर्यावरण प्रेमी, अभिनेते, राजकीय पक्षांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या रहिवाश्यांच्या बाजूने उतरल्या आहेत.

शिवसेनेची सत्ता असणाऱ्या पालिकेत भाजपने वृक्ष प्राधिकरण समितीने झाडे तोडण्याचा हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. यानंतर शिवसेनेने या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर मनसेचे युवा नेतृत्व अमित ठाकरे यांनी देखील या निर्णयाला विरोध केला आहे. आता सुप्रिया सुळे या विरोधात उतरत असल्याने झाडे तोडण्याच्या विरोधातील ही मोहीम अधिक तीव्र होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Supriya Sule will visit Aarey metro car shade