'मल्टी'लुटीविरुद्ध मनसेचा सविनय कायदेभंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - बाहेरील खाद्यपदार्थांना अटकाव करण्याच्या मल्टिप्लेक्‍स चालकांच्या मनमानीविरुद्ध सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी परळच्या "पीव्हीआर'मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. त्यांनी तिकीट काढून बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊन खाल्ले.

मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पंधरा कार्यकर्त्यांसह दुपारी पावणेतीनच्या खेळाची तिकिटे काढली. त्यांनी आपल्यासोबत सामोसेही नेले होते. त्यांनीच पूर्वसूचना दिल्याने पोलिसही तेथे हजर होते.

चित्रपटगृहाच्या सुरक्षारक्षांनी त्यांची झडती घेऊन खाद्यपदार्थ आत नेऊ शकत नाही, असे सांगितले. पोलिसांनीही सुरक्षारक्षकांची बाजू घेतली; जणू या संधीची वाट पाहत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी लगेच जोरदार भांडण सुरू केले. "खाणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे, तुम्ही आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही', असे त्यांनी सुरक्षारक्षकांना सुनावले. पोलिसांशीही त्यांना बराच वादविवाद करावा लागला. शेवटी, तुम्ही चित्रपटगृहाचे रक्षक आहात की जनतेचे? तुम्ही का मध्ये पडत आहात, असे त्यांनी पोलिसांना ऐकवले. शेवटी हे कार्यकर्ते तसेच आत गेले व तेथेच बसून त्यांनी सामोसे खाल्ले.

बाहेरील खाद्यपदार्थ एक ऑगस्टपासून चित्रपटगृहात नेऊ देण्याबाबतचा "जीआर' चित्रपटगृहांना मिळाला नाही, असे पोलिसांचे म्हणणे होते; पण हा आमचा दोष नाही. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली होती. त्याला काहीच किंमत नाही का, असा प्रश्‍नही आंदोलकांनी केला.

Web Title: Multiplex food Issue MNS