esakal | नवी मुंबई : धबधब्यावर अडकलेल्या ३६८ जणांची अग्निशमन दलाकडून सुटका!
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई : धबधब्याजवळ अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका करणारी अग्निशमन दलाची टीम.

नवी मुंबई : धबधब्यावर अडकलेल्या ३६८ जणांची सुटका!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : मुसळधार पावसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी धबधब्यावर वर्षासहलीसाठी गेलेल्या हौशी नागरिकांना रविवारी चांगलाच फटका बसला. खारघर, सेक्टर ५ मध्ये धबधब्यावर गेलेले तब्बल ११८ पर्यटक पाण्याच्या प्रवाहाने जोर पकडल्याने अडकून पडले होते. अखेर खारघर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून शिडीच्या सहाय्याने त्यांची सुटका केली. दुसऱ्या घटनेत बेलापूर, सेक्टर ८ मध्ये धबधब्यावर गेलेल्या तब्बल २५० पर्यटकांची बेलापूर अग्निशमन दलाच्या पथकांनी दोरीच्या सहाय्याने मोठ्या प्रयत्नांनी सुखरूप सुटका केली. (Mumbai 368 people trapped at the waterfall released aau85)

हेही वाचा: लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळं ज्येष्ठ नागरिकाचा वाचला जीव!

खारघर, सेक्टर ५ मधील गणपती मंदिरासमोरील डोंगरावरून धबधबा वाहतो. शहराच्या एका बाजूला असलेला हा धबधबा फारसा कोणाच्या नजरेत येत नाही. आज सकाळपासून धबधब्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. खारघर, पनवेल, बेलापूर आदी भागांतील पर्यटक पांडवकडा धबधबा बंद असल्याने बहुतांश इथेच पावसाची मजा घ्यायला येतात. दुपारच्या सुमारास धबधब्यावर जाताना झऱ्यातील पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे बरेच जण कुटुंबांसह तिथे गेले. लहान मुलेही त्यांच्या सोबत होती. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे झऱ्यातील वाढत्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला. त्यामुळे परतताना अनेकांना झरा ओलांडता न आल्याने डोंगराच्या बाजूला ते अडकून पडले. बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिल्यानंतर प्रवाह कमी न झाल्याने अखेर त्यापैकी दोन जणांनी खारघर अग्निशमन दलाशी संपर्क केला. अग्निशमन दलाच्या १५ जणांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके आणि अग्निशमन केंद्र अधिकारी प्रवीण बोडके यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य सुरू करण्यात आले. प्रवाहातील पाण्याचा प्रचंड वेग असल्याने झऱ्यापलीकडे जाऊन दोर बांधणे अशक्य होते. त्यामुळे अग्मिशमन दलाने सोबत नेलेली ३५ फूट लांबीची शिडी झऱ्यावर धरली. पाण्याचा वेग जास्त असल्याने दोन्ही बाजूने शिडी घट्ट धरल्यानंतर झरा ओलांडून नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात यश आले. सुटका करण्यात आलेल्या ११८ पैकी ७८ स्त्रिया, ३५ पुरुष आणि ५ वर्षांखालील पाच बालकांचा समावेश आहे.

२५० नागरिक सुखरूप

बेलापूर, सेक्टर ८ मधील आर्टिस्ट व्हिलेजच्या मागे डोंगररांगांमधून वाहणाऱ्या धबधब्यांवर गेलेले पर्यटक आज संध्याकाळी परतताना ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पलीकडे अडकून पडले. परतीचे मार्ग धूसर दिसू लागल्याने त्यांनी बेलापूर अग्निशमन दलाशी संपर्क केला. अग्मिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ओढ्यावर दोराच्या सहाय्याने मानवी साखळी तयार करून स्थानिकांच्या मदतीने अडकलेल्या २५० जणांची सुखरूप सुटका केली. त्यात नऊ वर्षांवरील लहान मुलांपासून स्त्री व पुरुषांचा समावेश असल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकारी रमेश कोकाटे यांनी दिली.

loading image