एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणारे 4 तोतया अधिकारी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accused Arrested

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एनसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अकोला जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Mumbai Crime : एनसीबी अधिकारी असल्याचे सांगत फसवणूक करणारे 4 तोतया अधिकारी अटकेत

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे एनसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना अकोला जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. नादी शहा, एजाज शहा, मोहसिक शहा , असिक शहा अशी चार तोतया एनसीबी अधिकाऱ्यांची नावे असून हे सगळे अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहे.एनसीबीच्या मुंबईच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवर दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी आरोपीची कार ताब्यात घेतली आहे. कारवर राष्ट्रीय चिन्ह, एनसीबीच्या एजन्सीचा लोगो आणि लाल दिवा लावलेला होता.

23 मार्च रोजी अटक केली

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या चारही आरोपींना 23 मार्चच्या रात्री अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावातून अटक करण्यात आली होती. हे सर्व आरोपी गेल्या एक महिन्यापासून या गावातील पान दुकान मालक व इतर विक्रेत्यांवर एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगत कारवाई करत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा मूळचा अकोल्याचा असून त्याच्याकडे एमटेकची पदवी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट ओळखीतून फसवणूक केली

अकोल्यातील दहीहंडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की, काही लोक एनसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी म्हणून गेल्या एक महिन्यापासून येथे कारवाया करत आहेत. पोलिसांना आरोपी त्यांच्या बनावट ओळखपत्राद्वारे 'पान' दुकानांच्या मालकांविरुद्ध कारवाया करत असल्याची माहिती मिळाली. स्थानिक लोकांना त्यांच्या हालचालींचा संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

राष्ट्रीय चिन्ह, लाल बत्ती जप्त

या प्रकरणी पोलिसांनी चारही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी खाजगी कार वापरली, ज्याच्या पुढील आणि मागील बाजूस राष्ट्रीय चिन्ह तसेच त्यावर 'डेप्युटी झोनल डायरेक्टर-एनसीबी' लिहिलेली प्लेट होती. याशिवाय गाडीच्या वर एक लाल दिवा देखील होता. त्यांच्याकडून बनावट लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड आणि शिक्केही सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई एनसीबीच्या अधिकारी तक्रारदार

अकोला पोलिसांनी सर्व आरोपीना ताब्यात घेतले आणि त्यांची ओळख पडताळण्यासाठी त्यांना मुंबईतील एनसीबी कार्यालयाला संपर्क केला. एनसीबी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की ते एनसीबीचे कर्मचारी नाहीत. मुंबईतील एनसीबी अधिकारी अमोल मोरे यांनी सर्व आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.