मुंबईचे सातही तलाव तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

लाव क्षेत्रात पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरून वाहू लागले असून ९० टक्के जलसाठा झाला आहे. हा साठा मुंबईकरांना १८ जुलै २०२० पर्यंत पुरेल इतका आहे.

मुंबई : तलाव क्षेत्रात पडणाऱ्या दमदार पावसामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे सातही तलाव भरून वाहू लागले असून ९० टक्के जलसाठा झाला आहे. हा साठा मुंबईकरांना १८ जुलै २०२० पर्यंत पुरेल इतका आहे. तलाव क्षेत्रात सध्या सुरू असणारा जोरदार पाऊस तसेच हवामान खात्याने ऑगस्ट, सप्टेंबरमध्येही जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असल्याने मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३ हजार ६५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो; मात्र गेल्या वर्षी परतीच्या पावसाने तलाव क्षेत्राकडे पाठ फिरवल्यामुळे तलावात कमी पाणीसाठा शिल्लक राहिला. त्यामुळे नोव्हेंबर २०१८ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात करण्यात आली होती.   यावर्षीचा जून कोरडा गेल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट होते; मात्र जुलैमध्ये तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याच्या पातळीने गेल्या वर्षीची सरासरीही ओलांडली आहे.

यंदा तुळशी, तानसा, मोडकसागर हे तलाव भरून वाहू लागले आहेत. विहार तलाव ३१ जुलै रोजी भरून वाहू लागला. पुरेशा पावसाने वैतरणा आणि भातसा तलावाचे २९ जुलै रोजी दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

यंदा पाणीकपात नाही
 पावसाळा संपल्यानंतर १ ऑक्‍टोबरला तलावांतील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यामध्ये सातही तलावांत मिळून वर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्‍यक असते. यावर्षी २ ऑगस्टला तलावांत १२,७५,०१७ दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. अजून पावसाचे दोन महिने शिल्लक आहेत, त्यामुळे यंदा पाणीकपात करावी लागणार नाही असेही जलअभियंता विभागाने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai 7 dam overflow