esakal | Mumbai : सहा वर्षांत बेस्टच्या सर्व बस इलेक्ट्रिक!
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai : सहा वर्षांत बेस्टच्या सर्व बस इलेक्ट्रिक!

Mumbai : सहा वर्षांत बेस्टच्या सर्व बस इलेक्ट्रिक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातील डिझेल आणि नैसर्गिक वायूवर धावणाऱ्या बस येत्या सहा वर्षांत हद्दपार होणार आहेत. २०२७ पर्यंत बेस्टच्या ताफ्यातील सर्व बस इलेक्ट्रिक असतील. त्याचबरोबर लवकरच २०० डबल डेकर बसही बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत, असे आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच, बेस्ट बसची संख्या १० हजारांपर्यंत वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालयात आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत वुमन फॉर क्लायमेट, सिटीज फॉर फॉरेस्टस् कॅम्पेन, ई-बस मिशन अशा तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा म्हणून बेस्ट आणि महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुढील काळात बेस्टच्या ताफ्यात १० हजार बस आणण्यात येतील; तर २०२७ पर्यंत सर्व बस इलेक्ट्रिक असतील, अशी घोषणा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३ हजार २४२ बस आहेत; तर एक हजाराच्या आसपास भाड्याच्या बस आहेत. तसेच, १९०० बस ताफ्यात सामील करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, खासदार अरविंद सावंत, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आदी अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ‘वुमन फॉर क्लायमेट’ या उपक्रमासाठी २५ महिलांची निवड केली जाणार आहे. पर्यावरण संरक्षण व संवर्धन उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्यासाठी, निरनिराळे उपाय सुचवून त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी महिलांचे नेतृत्व विकसित करण्यात येणार आहे. सिटीज् फॉर फॉरेस्टस या वनसंरक्षणाशी निगडित करारावर जगभरातील ५७ शहरांनी सप्टेंबर २०२१ रोजी स्वाक्षरी केली आहे. त्यात मुंबईचाही समावेश झाला आहे.

हायड्रोजनवर धावणार डबल डेकर

बेस्टच्या ताफ्यात सध्या फक्त ४० डबलडेकर बस उरल्या आहेत. भविष्यात डबल डेकर बस बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे; मात्र येत्या काळात बेस्टच्या ताफ्यात २०० डबल डेकर बस दाखल होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. या बस इलेक्ट्रिक अथवा हायड्रोजनवर चालणाऱ्या असतील. त्याबाबत चाचपणी सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

loading image
go to top