AC Local : सर्वच लोकल वातानुकूलित होणार?

मुंबई उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलितमध्ये (एसी) रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
AC Local
AC LocalSakal
Summary

मुंबई उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलितमध्ये (एसी) रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

- नितीन बिनेकर

मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वेचे संपूर्ण वातानुकूलितमध्ये (एसी) रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच शिंदे-फडणवीस सरकारने ‘एमयूटीपी -३ अ’ प्रकल्पासाठी सात हजार कोटींचे कर्ज उभारण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा एसी करण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) कंबर कसली आहे. पारंपरिक लोकलमधून एसी लोकलमध्ये मुंबईकरांना योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. एका खासगी कंपनीला याचे काम दिले असून ही कंपनी वर्षभरात सर्वेक्षणाचा अहवाल एमआरव्हीसीकडे सादर करणार आहे.

एमआरव्हीसीच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात (एमयूटीपी) मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण २३८ एसी लोकल सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-३ मधील ४७ आणि एमयूटीपी-३ अ मधील १९१ एसी लोकलचा समावेश आहे. २०१९ पासून सरकारकडून प्रतिसाद नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. राज्यात सत्तापालटानंतर सरकारने सुधारित प्रकल्पाला अर्थसाह्य उभारण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीच्या प्रक्रियेला चालना मिळाली आहे. एमयूटीपी-३ आणि एमयूटीपी-३ अ अंतर्गत २३८ एसी लोकल निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अभ्यास करून धोरण

मुंबई लोकलचे रूपांतर एसीमध्ये होणार असल्याने पारंपरिक नॉन-एसी लोकलचे एसीत स्थलांतर कसे करावे याबद्दल अभ्यास करून धोरण तयार करणे आवश्यक आहे. यासाठी ‘सिस्टा’ कंपनीची नियुक्ती केली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सर्वेक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत एमआरव्हीसीने दिली आहे. त्यानंतर सर्व बाबींचा विचार करून धोरण ठरवले जाणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पारंपरिक लोकलमधून एसी लोकलकडे प्रवाशांना कमीत कमी गैरसोयींसह स्थलांतर केले जाणार आहे. ऑपरेशनच्या दृष्टिकोनातून कार्यक्षम रीतीने स्थलांतर धोरण विकसित करणे हा अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे. सध्या हाच अभ्यास करण्यात येत आहे.

- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मुंबई रेल्वे विकास महामंडळ

एसी लोकलबाबत तपशीलवार अभ्यास!

पारंपरिक लोकलमधून मुंबईकरांना एसी लोकलमध्ये योग्य पद्धतीने स्थलांतरित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात एसी लोकल समाविष्ट करण्यासाठी सध्याच्या प्रवाशांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि संभाव्य स्थलांतर धोरण तयार करणे ही कामाची व्याप्ती असणार आहे. सध्याच्या रहदारीचे मूळ-गंतव्य मॅट्रिक्स, प्रवासी प्रोफाईल, आराम आणि प्रवासाची सोय, गर्दी आदींसंबंधी विद्यमान माहिती घेऊन अभ्यास केला जाणार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत नव्या एसी लोकल एक किंवा दोन येत होत्या; परंतु भविष्यात उपनगरीय सेवेत नव्या एसी लोकलची संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नव्या एसी लोकल सरळसेवेत दाखल करत असताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, वेळापत्रकावर परिणाम होऊन नये, याकरिता एमआरव्हीसी पूर्वतयारी करत आहे.

सर्व विनावातानुकूलित लोकल वातानुकूलित लोकलमध्ये रूपांतरित झाल्यानंतर सामान्य प्रवाशांसमोर तिकीट भाड्याचा प्रश्न येणार आहे. या अभ्यासामध्ये प्रवाशांना तिकीट भाडे कमी झाल्यास तुम्ही वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणार का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.

त्यामुळे येणाऱ्या उपनगरीय एसी लोकलची संख्या वाढल्यास वातानुकूलित एसी लोकलचे तिकीट दर कमी होणार असल्याची माहितीही समोर येत आहे.

लोकल गाड्या

  • एकूण २३८ एसी लोकल गाड्या

  • एमयूटीटीपी -३ अंतर्गत ४७

  • एमयूटीटीपी -३ अ अंतर्गत १९१

एसी लोकलला चांगला प्रतिसाद

एसी लोकलची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी रेल्वेने तिकीट दर निम्म्याने कमी केले होते. त्यानंतर एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच या लोकलमुळे दरवाजामधून लटकून होणारे अपघात बंद झाले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला ७९, तर मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकलच्या फेऱ्या होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com