बीकेसी, मुलुंड, दहिसरची जंबो कोविड सेंटर्स बंदच राहणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jumbo-covid-centre

बीकेसी, मुलुंड, दहिसरची जंबो कोविड सेंटर्स बंदच राहणार!

  • मुंबई महापालिका प्रशासनाने केलं स्पष्ट

मुंबई: तौक्ते चक्रीवादळानंतर (Cyclone Tauktae) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने (Mumbai BMC) शहर आणि उपनगरातील तीन मोठ्या जंबो कोविड केंद्रांना (Jumbo Covid Care Centers) दुरुस्तीच्या कामासाठी बंद केले होते. ही केंद्र पुन्हा 1 जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, आता पालिका प्रशासनाने बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो कोविड ही तिन्ही केंद्रे सद्यस्थितीत सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली तर ही तीनही केंद्रे सुरू केले जातील, असे प्रशासनाचे स्पष्ट केले आहे. (Mumbai BMC says Covid Centers at BKC Mulund and Dahisar Jumbo Covid Care Centers will remain closed for now)

तौक्ते चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता चक्रीवादळाच्या एक दिवस आधी बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो सेंटरमध्ये दाखल झालेल्या रूग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. वादळ गेल्यानंतर या तिन्ही रुग्णालयांची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, जेणेकरुन इथल्या रुग्णांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, गेल्या एका वर्षापासून तात्पुरत्या रुग्णालयात काम सुरू आहेत. आणि त्यामुळे पावसाळ्यापूर्वी आणि इतर तातडीच्या कामांच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयांची दुरुस्ती ही गरजेची होती. दरम्यान, दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही ही तीन जंबो कोविड केंद्रे सुरू केली जाणार नाहीत.

काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, कोविड रुग्णालयात सध्या कोरोना रूग्णांची संख्या कमी असून मोठ्या संख्येने बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे ही केंद्रे कार्यान्वित करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मुंबईत पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास ती त्वरित कार्यान्वित होईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईतील भायखळा, वरळी आणि गोरेगाव येथे तीन जंबो कोविड केअर केंद्रे कार्यरत आहेत.

पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दरम्यान जर तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला तर त्याचीही तयारी सुरू आहे. तसेच शहरात काही नवीन मोठी केंद्रे बांधण्याचीही योजना आहे.

तीन जंबो केंद्रांमध्ये 47 हजार 227 कोरोनामुक्त-

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरू झालेल्या 6 जंबो केंद्रांपैकी बीकेसी, दहिसर आणि मुलुंडमधील तीन जंबो कोविड केअर केंद्रात केवळ एका वर्षात 47 हजार 227 नागरिक कोरोना मुक्त झाले आहेत. त्यापैकी बीकेसीमध्ये 24 हजार 149, मुलुंडमध्ये 12 हजार 927 आणि दहिसर जंबो कोविड केअर सेंटरमधील 10 हजार 151 रूग्ण एका वर्षात बरे होऊन घरी गेले आहेत.

(संपादन- विराज भागवत)