मुंबईकरांनी केली जीवाची गटारी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

कामिका एकादशी असतानाही मांसाहारींकडून 3,600 टन कोंबड्या फस्त.

मुंबई : श्रावण महिना सुरू होण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने मांसाहारी खवय्यांनी एका दिवसात तब्बल ३ हजार ६०० टन कोंबड्या फस्त केल्या. मासळी बाजारातही मत्स्यप्रेमींची गर्दी उसळली होती. कामिका एकादशी असतानाही शहरातील मटण, चिकन आणि मासळी विक्रेत्यांकडे नागरिकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. 

आस्वाद घेत सामिष भोजनावर ताव मारला की श्रावण पाळण्यास मोकळे, असा विचार करून जवळच्या मित्रांसोबत गटारीच्या ओल्या पार्ट्या रंगतात. अशा अनेक पार्ट्या आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात रंगल्या. परिणामी वाईन शॉपवर गर्दी होती आणि लाखो कोंबड्या फस्त झाल्या. शहरातील मटण, चिकन व मासळी विक्री करणाऱ्या दुकानांसमोर नागरिकांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. 

मटण-मासळी बाजारात खवय्यांची झुंबड
गटारीनिमित्त मासे-मटण महाग असल्याने मांसाहारींनी तुलनेने स्वस्त असलेल्या कोंबड्यांवर ताव मारला. रविवारी सकाळपासूनच कोंबड्यांच्या दुकानाबाहेर खवय्यांची गर्दी दिसत होती. कोंबड्यांचे दर वाढले असले, तरी त्याची पर्वा न करता रविवारी मुंबईकरांनी ३ हजार ६०० टन कोंबड्या फस्त करून जीवाची गटारी साजरी केली. मुंबई आणि आसपासच्या परिसरात गटारीनिमित्त ओल्या पार्ट्या रंगल्या होत्या. काहींनी एकादशीमुळे घरात पार्टी करण्याऐवजी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन गटारी साजरी केली. एकादशी न पाळणाऱ्यांनी घरीच पार्टी केली. 

कोंबड्यांच्या २०० गाड्या दाखल
मुसळधार पाऊस आणि कोंबड्यांची मागणी वाढल्यामुळे ऐन गटारीच्या तोंडावर दर किलोमागे २० रुपयांनी वाढले होते. मुंबईत दररोज साधारण १५०० टन कोंबड्या विकल्या जातात. रविवारी तर मुंबईकर १८०० टन कोंबड्या फस्त करतात. ‘गटारी’ला आकडा दुपटीने वाढल्याने ३६०० टन कोंबड्या खपल्या. ‘गटारी’निमित्त मुंबईत कोंबड्यांच्या २०० गाड्या दाखल झाल्या होत्या. 

तळेगाव, चाकण, शिरूर, शिक्रापूर, नाशिक, सासवड, नारायणगाव, संगमनेर आदी ठिकाणांबून मुंबईत कोंबड्या मोठ्या प्रमाणात येतात. परंतु दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात काही वाहने अडकली होती. वाहने मुंबईला पोहोचण्यास झालेला उशीर आणि वाढलेल्या मागणीमुळे किलोमागे ११० रुपये असलेला कोंबडीचा दर १३० रुपयांवर गेला, अशी माहिती सिद्धिविनायक पोल्ट्री ब्रीडिंग फार्म अॅण्ड हॅचरिज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. अजय देशपांडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai Citizens queues for meat, chicken and fish during kamika ekadashi