जगात परवडण्याजोग्या शहरांमध्ये मुंबईचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मार्च 2019

ॲमस्टरडॅम सर्वांत महागडे
ॲमस्टरडॅम हे राहण्यासाठी जगातील सर्वांत महागडे शहर ठरले. त्यानंतर ऑकलंड, हाँगकाँग, लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, सिडनी, टोरांटो आणि व्हॅंकुव्हर यांचे क्रमांक लागतात.

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईने जगातील सर्वांत परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत स्थान पटकावले. त्याचप्रमाणे मुंबईने २०१४ ते २०१८ या पाच वर्षांत सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे. 

लंडन येथील ‘नाइट फ्रॅंक’ या रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थेने ‘अर्बन फ्युचर्स’ अहवालाचा एक भाग म्हणून ‘ग्लोबल अफोर्डिबिलिटी मॉनिटर’ उपक्रमांतर्गत ३२ शहरांचे सर्वेक्षण केले. घरांच्या किमती व उत्पन्न यातील गुणोत्तर, उत्पन्नाशी घरभाड्याचे प्रमाण, प्रत्यक्ष उत्पन्नवाढ व घराच्या प्रत्यक्ष किमतीतील वाढ यांची तुलना करण्यात आली.   

जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात मुंबईत वार्षिक कौटुंबिक उत्पन्नात २०.४ टक्के वाढ झाल्याचे तसेच घरांच्या किमती मात्र आठ टक्के दराने वाढल्याचे स्पष्ट झाले. तुलनेने परवडण्याजोग्या शहरांच्या यादीत मुंबईसोबत ब्रसेल्स, केपटाउन, माद्रिद, मायामी, मॉस्को, पॅरिस, स्टॉकहोम यांचा समावेश आहे. 

न्यूयॉर्कमधील उत्पन्नवाढ घरांच्या किमतीतील वाढीच्या तुलनेत तीन टक्‍के अधिक होती. मॉस्को, सिंगापूर, मुंबई आणि पॅरिस या शहरांमध्ये पाच वर्षांत घरांच्या किमतीतील वाढीच्या तुलनेत उत्पन्नवाढीचा वेग अधिक होता. प्रत्यक्ष उत्पन्नातील वाढ घरांच्या किमतीतील वाढीच्या तुलनेत मॉस्कोत सर्वाधिक २२ टक्के होती. 

मुंबई, मॉस्को, सिंगापूर, पॅरिस या शहरांमध्ये सरासरी वास्तव उत्पन्नात घरांच्या प्रत्यक्ष किमतीच्या तुलनेत वेगाने वाढ झाली. मुंबई ही देशातील सर्वांत महागडी बाजारपेठ समजली जात असली, तरी गेल्या काही वर्षांत घरे परवडण्याजोगी झाली आहेत. घरखरेदीसाठी २०१४ मध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या ११ पट रक्कम मोजावी लागत होती; ती आता सात पटींवर आली आहे.

Web Title: Mumbai City Home Rate Reasonable World