नालेसफाईची टक्केवारी पुन्हा गाजली, वाढीव खर्चावरुन स्थायी समितीकडून चौकशीचे आदेश

समीर सुर्वे
Thursday, 19 November 2020

नालेसफाईच्या वाढीव खर्चावरुन महापालिकेच्या स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मुंबईत पहिल्यादांच 17 तास पाणी तुंबून राहिले. कसली नालेसफाई झाली. त्यात हा वाढीव खर्च कसा असा प्रश्‍न उपस्थित करत या खर्चाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई: नालेसफाईच्या वाढीव खर्चावरुन महापालिकेच्या स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मुंबईत पहिल्यादांच 17 तास पाणी तुंबून राहिले. कसली नालेसफाई झाली. त्यात हा वाढीव खर्च कसा असा प्रश्‍न उपस्थित करत या खर्चाबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. हा वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीने प्रशासनाकडे फेरविचारासाठी पाठवला असून या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याचे निर्देश ही प्रशासनाला देण्यात आले आहे.

नालेसफाईसाठी वाढीव खर्च कंत्राटदाराला देण्याचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावावर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते रवी रांजा यांनी नालेसफाईवर प्रश्न उपस्थित केला. मुंबईत पूर्वी 245 ठिकाणी पाणी तुंबायचे. यंदा ही संख्या 350 वर पोहोचली. मग नक्की नालेसफाई झाली कशी? दक्षिण मुंबईतील ज्या भागात पाणी साचत नव्हते. तेथे यंदा पाणी साचले याकडे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी लक्ष वेधले. 

भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी नालेसफाईच्या टक्केवारीवर हल्ला चढवला. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी 113 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. मात्र,पहिल्यांदाच मुंबईत 17 तास पाणी साचून राहिले. आयुक्तांनी कशाच्या आधारावर 113 टक्के नाले सफाई झाल्याचा दावा केला. नाल्यातून किती गाळ काढण्यात आला याची माहिती मिळायली पाहिजे. या निवीदा प्रक्रियेची दक्षता विभागा मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी महानगर पालिकेनं नालेसफाई पालिकेच्या कामगारांकडून करुन घेतली होती. कंत्राटदारांना द्यायचे 72 कोटी तेव्हा पालिकेने वाचवले होते, असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा-  उद्रेक झाला तर त्याला सरकार जबाबदार, मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

स्थायी समितीत तब्बल 35 टक्के वाढीव खर्चाचा प्रस्ताव सादर झाला आहे. या निवीदेसह कंत्राटदाराची चौकशी करुन त्याचा अहवाल स्थायी समितीच्या पटलावर मांडा. तसेच कामचुकार कंत्राटदारांची बिलेही रोखा असे निर्देश अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. एकच कंत्राटदार वेगवेगळ्या कंपन्या तयार करुन निवीदा भरत आहे. त्यालाच नालेसफाईचे काम मिळते. या प्रकरणातही चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

लॉकडाऊनमुळे कामगार मिळाले नाहीत

नाले सफाईच्या काळातच कोविडमुळे लॉकडाऊन आल्याने कामगार उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे मोठे नाले यंत्रांनी साफ करण्यात आले. लहान नाले साफ करताना थोडी फार अडचण झाली असा दावा अतिरिक्त आयुक्त पी.वेलारसू यांनी केला.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai cleaning drains issue increased cost Order inquiry from Standing Committee


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai cleaning drains issue increased cost Order inquiry from Standing Committee