Mumbai : मुक्त वातावरणात कामांना गती मिळतेय ; मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे : लोकभावना जाणून घेत पुढे जाणार
eknath shinde
eknath shindesakal

मुंबई : गेली दोन वर्ष आपल्यावर निर्बंध होते. मात्र, यावर्षी आपण मुक्त वातावरणात सर्व सण साजरे करीत आहोत. याच मुक्त वातावरणात कामांना गती मिळतेय. महाराष्ट्राकडे देशभरातील लोक आशेने बघत आहेत. जनतेसाठीच आम्ही हे शिवधनुष्य पेलले आहे आणि लोकांच्या भावना जाणून घेत हे सरकार पुढे जाणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा देताना म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, आज आपण प्रकाशाचा उत्सव साजरा करीत आहोत. राज्यावर आलेली मरगळ झटकली जात आहे. राजकारण करताना समाजकारणाला प्राधान्य द्या, अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली, तर आनंद दिघेंनी लोकांच्या हक्कासाठी लढायला शिकवले.

त्यामुळे शेतकरी, वंचित शोषित, पीडित लोकांच्या विकासाचा ध्यास सरकारने घेतला आहे. पहिल्याच बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनीही ठामपणे हेच सांगितले आणि त्याप्रमाणे निर्णय घेतले जात आहेत. हे सरकार प्रत्येकाच्या मनातले आहे हे सांगताना आनंद होतोय.

७५ हजार पदांची भरती

राज्यातील भरतीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, २० हजार पोलिसांच्या पदभरतीसह एकूण ७५ हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांच्या घराच्या किमती ५० लाख रुपयांवरून १५ लाख रुपयांपर्यंत कमी केल्या आहेत. राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करतोय. ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणीचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला २ कोटी देण्यात येणार आहेत.

लॉजिस्टिक पार्कचे काम सुरू

टाटांसोबत यासंदर्भात सामंजस्य करार झाल्यानंतर लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. राज्यातल्या खेळाडूंसाठी नवे धोरण आखले आहे. जेणेकरून आपले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवतील. सर्वच क्षेत्रांत कामाचा धडाका सुरू आहे.

अनेक कामांना दिशा देण्याचे काम सुरू आहे. सरकारच्या कामांत सर्वसामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटेल, असा प्रयत्न आहे. लोकांच्या भावना समजून घेऊन पुढे जाणारे हे सरकार आहे. जनतेला सोबत घेऊन अहोरात्र काम करण्याची तयारी आहे. आपण ते अनुभवत आहातच. आपल्या सरकारला अजून मोठी मजल गाठायची आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेला दीपोत्सवानिमित्त निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.

आपत्तींनी डगमगलो नाही

आलेल्या आपत्तीने आजपर्यंत डगमगलो नाही. त्यामुळेच चांगल्या योजना सुरू केल्या. अंमलबजावणीत अडचणी आल्या असतील. पण कामे सुरू आहेत. ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटीचा मोफत प्रवास योजना सुरू केली. १ कोटीपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत त्याचा लाभ घेतला. शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ शंभर रुपयांत दिला.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी एनडीआरच्या निकषांच्या दुप्पट मदत दिली. निकषात न बसणाऱ्यांना ३० लाख शेतकऱ्यांना ४ हजार कोटी देऊन दिलासा दिला. ७५५ कोटी रुपयांची मदत इतर शेतकऱ्यांना सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांवर भूविकास बॅंकेचे कर्ज होते, अशा शेतकऱ्यांना ९५० कोटींची कर्जमाफी दिली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच लाख कोटी रुपये जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘समृद्धी’चा नागपूर-शिर्डी टप्पा लवकरच

समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकर सुरू होत आहे. सोबतच नागपूर-गोवा कॉरिडोरचे काम सुरू होणार आहे. एकट्या मुंबईतील विकास कामांसाठी एनएमआरडीए मार्फत ६० हजार कोटी रुपये खर्चून कामे केली जात आहेत. मुंबईत मेट्रोचे जाळे विणले आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी दूर होईल. केंद्र सरकारच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यासाठी मित्र संस्था स्थापन केली आहे. ‘वॉर रुम’मधून सर्व कामांचे मॉनिटरिंग केले जात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com